वसंत भोईर, वाडापालघर जिल्ह्यात टोमॅटोचे उत्पादन जास्त होत नाही. मात्र वाड्यातील देवघर येथील ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून टोमॅटोचे विक्रमी उत्पादन घेऊन त्याची शेती यशस्वी केली आहे.वसई तालुक्यातील आडणे, भाताणे येथे टोमॅटोची लागवड केली जाते. ठाणे जिल्ह्यातील काही गावांमध्ये याचे तुरळक प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र वाडा तालुक्यात सन २०१२ साठी वाडा पंचायत समितीत कुणबी सेना सत्तेवर आली तेव्हा देवघर गावचे सुपुत्र प्रफुल्ल पाटील हे उपसभापती झाले आणि त्यांनी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अर्थसहाय घेऊन शिवजलधारा योजनेअंतर्गत गावातील बहुसंख्य शेतकऱ्यांना टोमॅटोचे उत्पादन घ्यायला प्रवृत्त केले. डोंगराच्या कुशीत असून देखील सिंचनाचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने शिवजलधारा योजनेचा प्रयोग पाटील यांनी प्रथम स्वत:च्या गावात करून तो यशस्वी केला. वाडा तालुक्याच्या ठिकाणापासून २३ कि. मी. तर कुडूसपासून ६ कि.मी. अंतरावर असणाऱ्या या गावात शेतकरी अभिनव आणि अलंकार हे टोमॅटोचे बियाणे आणून स्वत:च रोप तयार करतात व स्वत: त्याची लागवड करून रोपांची विक्रीदेखील करतात.एक एकरमधून १५०० क्रेट टोमॅटो निघतात याचे वजन ४५ ते ५५ टन असते. त्यासाठी २५०० ते ३००० रुपयांचे ५ पॅकेट बियाणे लागते. फवारणी तसेच मजुरी हा खर्च एकरासाठी अंदाजे दीड लाख रुपये येतो. टोमॅटोला ७ ते १५ रुपये प्रती किलो भाव मिळत असल्याने एकरी ३ लाख १२ हजारापर्यंत उत्पन्न देणाऱ्या टोमॅटोची लागवड करणाऱ्या मोठ्या शेतकऱ्यांना कृषीउत्पन्न बाजार समिती वाड्यात नसल्याने तो दलालांमार्फत विकावा लागतो.देवघर गावातील शेतकऱ्यांनी भात पिकाला पर्याय म्हणून टोमॅटोची शेती यशस्वी केली आहे. मात्र, सरकारच्या कृषी विभागाकडून त्यांना कोणतेही सहकार्य मिळत नसल्याची खंत येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मजुरांची कमतरता, खते, औषधांचा तुटवडा या गोष्टींमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होते. मात्र, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून येथील शेतकऱ्यांनी टोमॅटो उत्पादनात गेल्या अनेक वर्षांपासून आपला लौकिक कायम राखला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून वाडा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. परंतु ती आजवर पूर्ण झाली नसल्याने उत्पादन केलेल्या मालाला योग्य मोबदला मिळत नसल्याची खंत देवघर येथील शेतकरी किशोर पाटील, प्रकाश पाटील, रामचंद्र पाटील यांनी व्यक्त केली.
देवघरमध्ये टोमॅटोचे घेतले विक्रमी पीक
By admin | Published: March 14, 2016 1:36 AM