ठाणे : पानिपतकार विश्वास पाटील यांनी मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या संपावर आणि त्यातून बंद पडलेल्या गिरण्यांच्या जमीन विक्रीवर आधारित लिहिलेल्या ‘लस्ट फॉर लालबाग’ या ८०० पृष्ठांच्या कादंबरीची पहिली आवृत्ती ११ दिवसांत संपली. तिच्या दुसऱ्या आवृत्तीचे मुद्रण सुरू झाले असून तिचे कन्नड आणि हिंदी भाषेत भाषांतरही सुरू झाले आहे.कादंबरीबाबत अभिप्राय कळविणारे असंख्य दूरध्वनी लेखक विश्वास पाटील आणि प्रकाशक राजहंस प्रकाशनाला येत आहेत. एवढे मोठे सामाजिक स्थित्यंतर घडले तरी त्याची एवढ्या प्रत्ययकारी रूपात साहित्यात नोंद कशी घेतली गेली नाही, असा सवालही या वाचकांनी या वेळी केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या दुर्दैवीच होत्या, परंतु त्यांचा जेवढा व्यापक आविष्कार राष्ट्रीय आणि अन्य स्तरांवर विविध माध्यमांतून झाला, तसा आविष्कार या संपाचा आणि त्यातून उद्भवलेल्या परिणामांचा झाला नाही. ही एक मोठी उणीव साहित्यात होती. ती लस्टने भरून काढली, अशीही प्रतिक्रिया वाचकांनी व्यक्त केली आहे.कर्नाटकातील प्रख्यात साहित्यिक आणि अनुवादक प्रा. डॉ. चंद्रकांत पोखळे यांनी ही कादंबरी कन्नड भाषेत तर मुंबई विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख रामजी तिवारी यांनी ती हिंदीमध्ये अनुवादित करण्यास प्रारंभ केला आहे. याशिवाय, इतर अनेक भाषांतील अनुवादकांनीही त्याबाबतचे प्रयत्न सुरू केले आहेत. राजहंस प्रकाशनाचे संपादक डॉ. सदानंद बोरसे यांनी लोकमतला सांगितले की, ‘लस्ट फॉर लालबाग’ची दुसरी आवृत्तीही सवलतीत मिळणार असून तिची नोंदणी सुरू आहे. तर, ‘लस्ट फॉर लालबाग’चे लेखक विश्वास पाटील यांनी म्हटले आहे की, ‘सकस साहित्य जर वाचायला मिळाले तर वाचक त्याला किती भरभरून आणि उत्स्फूर्त प्रतिसाद देतात, ते पाहून मी भारावून गेलो आहे. सामाजिक स्वरूपाचा आणि बऱ्याच अंशी दुर्लक्षित असलेला हा विषय या कादंबरीतून मांडण्याचे धाडस मी केले, ते वाचकांनी भरभरून प्रतिसाद देऊन सार्थ ठरवले, याचा आनंद आहे.’
‘लस्ट फॉर लालबाग’ आवृत्तीचा विक्रमी खप
By admin | Published: November 30, 2015 3:08 AM