लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली: ठामपा हद्दीत उपायुक्तांवर हल्ला झाला, ही बाब गंभीर असून केडीएमसी हद्दीत फेरीवाला धोरण अवलंबण्यासाठी उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सत्ताधारी आणि महापालिका प्रशासन करू शकले नाही, ही शोकांतिका आहे. कल्याण स्टेशन परिसरात स्कायवॉक किंवा अन्यत्र बसायचे असल्यास मनपाची पावती वेगळीच, पण रोजच्या ५०० रुपयांची मागणी होत असल्याची माहिती आहे. ही मागणी कुर्ला परिसरातील गुंड, माफिया करतात, हे सर्वाधिक गंभीर असल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला.
पवार म्हणाले की, बाहेरून येणारी मंडळी स्थानिकांना व्यवसाय करू देत नाहीत. व्यवसायावर अतिक्रमण करतात. याच्या निषेधार्थ माजी मंत्री, आमदार रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली येथील फडके पथावर आंदोलन करून बाहेरच्या गुंड प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवला होता. त्यानंतर त्या ठिकाणी बाहेरच्या फेरीवाल्यांची दादागिरी कमी झाली. कल्याणमध्ये सावळागोंधळ असून ठामपाप्रमाणेच या ठिकाणीही कोट्यवधी रुपयांचा हप्ता गोळा होत असावा, असे पवार म्हणाले. गोळा होणारा हप्ता नेमका कोणाकोणापर्यंत पोहोचतो, हे शोधून काढणे कायदा व सुव्यवस्था हाताळणाऱ्या यंत्रणेचे काम आहे. त्यांनी ते पारदर्शी पद्धतीने करावे, अशी मागणी पवार यांनी केली. कोणत्याही अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला होणे हे दुर्दैवी आहे. शहरांत फेरीवाला धोरण तातडीने अंमलात आणणे ही महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांची जबाबदारी आहे. त्यांनी ती पार पाडावी, असे पवार म्हणाले.
........
वाचली