भिवंडी : तालुक्यातील गोदामपट्टा अशी ओळख असलेल्या वळगावच्या हद्दीतील वळपाडा येथील पारसनाथ कम्पाउंडमधील गाळा क्रमांक ८ येथे एचपी, कॅनॉन, सॅमसंग व इप्सोन या नामवंत इलेक्ट्रॉनिक कंपन्यांच्या उत्पादनांच्या पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारे सुमारे २५ कोटींहून अधिक रकमेचे पुठ्ठ्याचे साहित्य बुधवारी दुपारी छापा टाकून जप्त करण्यात आले. एका आरोपीस पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी पोलीस संकुलात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
किशोर आंबा बेरा (वय २८ वर्षे, रा. गणेशचाळ, ठाणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याने त्याच्या पारसनाथ कम्पाउंड येथील गोदामात एचपी, कॅनॉन, सॅमसंग व इप्सोन या नामवंत इलेक्ट्रॉनिक कंपन्यांचे पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारे सुमारे २५ कोटींहून अधिक किमतीचे पुठ्ठ्याचे केवळ रिकामे बॉक्स गोदामात ठेवल्याचे छापा टाकून हा माल जप्त केल्याने उघडकीस आले. या ठिकाणी अनधिकृत पॅकेजिंग साहित्य ठेवण्यात आले असल्याची खबर भिवंडीचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांना मिळाली असता त्यांनी नारपोली पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी छापा टाकून सदर मुद्देमाल जप्त केला. आरोपींवर कॉपीराइट अॅक्ट १९५७ चे कलम ५१ व कलम ६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कॉपीराइट अॅक्टअन्वये करण्यात आलेल्या देशातील मोठ्या कारवायांपैकी ही एक कारवाई असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली.नामांकित कंपन्यांच्या उत्पादनांचे पॅकिंग करण्यासाठी वापरले जाणारे बनावट पुठ्ठे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे संकेत पोलिसांनी दिले असून, यात बडे मासे अडकण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईत २५ कोटींपेक्षा अधिक रकमेचे नामांकित कंपन्यांचे प्रिंट केलेले पुठ्ठ्यांचे बॉक्स पत्रकार परिषदेत मांडले. पोलिसांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात जप्त केलेले हे साहित्य पाहून सारेच अवाक झाले. या गोदामात ठेवलेल्या या पुठ्ठ्यांचा वापर करून नामांकित कंपन्यांच्या उत्पादनांऐवजी कमी प्रतीची उत्पादने नामांकित कंपन्यांची असल्याचे भासवून त्याची विक्री केली जात होती किंवा कसे, या दृष्टीने आता पोलीस तपास करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.