ठाणे : मालमत्ताकर आणि पाणीबिल वसुलीसाठी आता महापालिकेने वसुलीचा अजब फंडा तयार केला आहे. यानुसार, थकबाकीदारांकडून वसुलीसाठी बॅण्डबाजाची बारात नेऊन वसुली करण्याचे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्यानंतर बुधवारी कळवा प्रभाग समितीअंतर्गत प्रथमच अशा प्रकारची कारवाई करून अवघ्या ४ तासांत ८ लाखांची वसुली केली. यामध्ये १० ते १५ वर्षे थकबाकी ठेवणाऱ्या थकबाकीदारांचा अधिक समावेश आहे.ठाणे महानगरपालिका हद्दीतील मालमत्ताकर न भरणाऱ्यांची संख्या ३५०० च्या घरात असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. त्यांच्याकडे ५० हजार ते १ लाखापर्यंतची थकबाकी आहे. त्यामुळे तिच्या वसुलीसाठी बॅण्डबाजासह जाण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या होत्या. त्यानुसार, याची सर्वात पहिली सुरुवात बुधवारी कळवा प्रभाग समितीने केली असून सहायक आयुक्त शंकर पाटोळे यांनी बॅण्ड पथक, पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा, पालिकेचे अतिक्रमण विभागातील कर्मचारी, पाणीपुरवठा आणि मालमत्ता विभागाचे कर्मचारी अशा सुमारे ३५ हून अधिक जणांच्या ताफ्याने बुधवारी खारेगाव भागात ही धडक मोहीम हाती घेतली. त्यात अवघ्या चार तासांत ८ लाखांची वसुली झाल्याची माहिती पाटोळे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
अवघ्या चार तासांत आठ लाखांची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2016 2:35 AM