ठाणे: शीळ डायघर भागातील मुंब्रा पनवेल रोडवरील व्यापा-यांची मोठी गोदामे हेरुन ती फोडून त्यातील मालाची विक्री करणा-या दोन वेगवेगळया टोळयांमधील १२ आरोपींना जेरबंद केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली. चोरीचा माल विकत घेणा-या दोघांचाही यात समावेश असून दोन्ही टोळयांकडून ३० लाख ११ हजार ४९३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचेही त्यांनी सांगितले.मुंब्रा पनवेल रोडवर अनेक व्यापा-यांची गोदामे आहेत. या गोदामांमध्ये किंमती मालाची साठवणूक करुन तो मागणी करणा-याकडे पुरवठा केला जातो. मात्र, अशाच गोदांमांमधून गेल्या काही दिवसांपासून चो-यांचे प्रमाण चांगलेच वाढले होते. याप्रकरणी शीळ डायघर पोलीस ठाण्यात एका व्यापा-याने गोदामातून दहा नव्या को-या झेरॉक्स मशिन चोरीस गेल्याची तक्रारही २७ नोव्हेंबर २०१८ रोजी केली होती. त्यापाठोपाठ १८ डिसेंबर रोजी चार लाख ४२ हजार ७७३ रुपये किंमतीचे १२१२ लोखंडी पत्रेही चोरीस गेले होते. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त विवेक फणळकर यांनी या चोºयांचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपायुक्त स्वामी आणि सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश सावंत यांनी दोन वेगवेगळी पथके तयार केली. दरम्यानच्याच काळात, झेरॉक्स मशिन चोरी करणा-या टोळीने एका टेम्पोमध्ये या झेरॉक्स मशिन घेऊन त्यांच्या विक्रीसाठी गुजरातच्या दिशेने निघाल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विकास राठोड आणि हवालदार शिरसाठ यांना मिळाली. याच माहितीच्या आधारे एक पथक गुजरातकडे पाठविण्यात आले. या पथकाने गुजरात पोलिसांच्या मदतीने अमित दरडा (रा. नालासोपारा), , खुश गडा (रा. नालासोपारा) , जुल्फीकर शेख (रा. पनवेल), चंद्रकांत छेडा (रा. नालासोपारा) आणि चोरीचा माल विकत घेणारा महेशभाई ठक्कर (रा. गुजरात) या पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या दहा झेरॉक्स मशिन आणि टेम्पो असा एकूण १५ लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.अन्य एका गोदाम चोरीतील टोळके हे उत्तरशिव, भांडार्ली येथे येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार शिरसाठ यांना मिळाली होती. त्याआधारे सापळा रचून असीफ शेख (रा. रायगड), मीतेश राजभर (रा. रायगड), मोहम्मद आमिन सिकंदर (रा. पनवेल), प्रकाश चौधरी (रा. उत्तरप्रदेश ), विनोद जयस्वाल (रा. उत्तर प्रदेश), सूरज केवट (रा. रायगड) आणि शबानअली खान (रा. नवी मुंबई ) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी शीळ डायघर भागात अशा प्रकारचे चार गुन्हे केल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून लोखंडी पत्रे, पाईप आणि डाळी असा १५ लाख ११ हजार ४९३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या दोन्ही टोळीतील आरोपींकडून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गोदामांची रेकी करुन चोरी करणाऱ्या दोन टोळयांमधील १२ आरोपी ठाण्यात जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 7:22 PM
डायघर भागातील बडया गोदामांची रेकी करुन ही गोदामे फोडून तेथील मालाची चोरी करणा-या दोन वेगवेगळया टोळयांना आणि चोरीतील माल विकत घेणा-या अशा १२ जणांना शीळ डायघर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून टेम्पोसह ३० लाख ११ हजारांचा चोरीतील ऐवजही हस्तगत करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे30 लाखांचा मुद्देमाल जप्त डायघर पोलिसांची कामगिरीपाच गुन्हयांची दिली कबूली