सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेने शेवटच्या १५ दिवसासाठी मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना लागू केली असून अवघ्या १२ दिवसात २५ कोटी पेक्षा जास्त वसुली झाली. तर एकून मालमत्ता कर वसुली ८२ कोटींवर गेली असून दिलेले टार्गेट पूर्ण होण्याची शक्यता उपायुक्त प्रियांका राजपूत यांनी व्यक्त केली.
उल्हासनगर महापालिकेचे मुख्य उत्पन्न स्रोता पैकी मालमत्ता कर विभागाकडून १०० कोटीचे टार्गेट ठेवण्यात आले. एका महिन्यापूर्वी विभागाची वसुली ५० कोटी पेक्षा जास्त नसल्याने, विभागावर सर्वस्तरातून चौफेर टीका झाली. दरम्यान राज्य शासनाने महापालिकेने विखंडणासाठी पाठविलेला अभय योजनेचा प्रस्ताव फेटाळल्याने, अभय योजना लागू करणे महापालिकेला भाग पडले. अखेर १५ दिवसासाठी अभय योजना महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी १६ ते ३१ मार्च दरम्यान सुरू केली. अभय योजने अंतर्गत १०० टक्के विलंब शुल्क माफ करण्यात येत आहे. विभागाच्या उपायुक्त प्रियंका राजपूत यांनी विभागाच्या कर्मचाऱ्यांना पूर्ण क्षमतेने कामाला लागण्याच्या सूचना करून सुट्टीच्या दिवसासह रात्री १२ वाजे पर्यंत मालमत्ता कर भरणा केंद्र सुरू ठेवण्याचे आदेश दिले. परिणामी सुरवातीला धीम्या गतीने सुरू झालेली अभय योजनेने नंतर गती पकडली आहे.
महापालिका मालमत्ता कर विभागाची २८ मार्च पर्यंत एकून वसुली ८२ कोटींवर गेली असून त्यापैकी अभय योजने अंतर्गत १२ दिवसात २५ कोटींची वसुली झाली. विभागाला १०० कोटीचे वसुली टार्गेट पूर्ण करायचे आहे. शेवटच्या तीन दिवसात ३१ मार्च पर्यंत वसुलीचे टार्गेट पूर्ण होणार असल्याचे संकेत उपायुक्त प्रियांका राजपूत यांनी दिले. अभय योजना यानंतर लागू होणार नसल्याने, नागरिकांनी अभय योजनेचा लाभ उठविण्याचे आवाहन करण्यात अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी केले. तसेच आयुक्त डॉ राजा दयानिधी विशेष लक्ष ठेवून असून विभाग १०० कोटी पेक्षा जास्त वसुली करणार असल्याचे संकेत दिले. विविध पक्षाचे नगरसेवक, सामाजिक संघटना अभय योजनेचा लाभ उठविण्याचे आवाहन करीत आहेत.