ठाणे : मुंब्रा बायपास मार्गावर अवजड वाहने रोखून त्यांच्याकडून पैसे घेतले जात असून यासंबंधीची चित्रफित राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर प्रसारित केल्याने खळबळ उडाली आहे. या मार्गावरील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांची पथके तैनात असतात आणि त्याचबरोब स्थानिक पोलिसांची गस्तही या मार्गावर असते. तरीही वाहन चालकांकडून पैसे वसूलीचे प्रकार सुरू असल्याचे यातून दिसत आहे.
ठाणे ते बदलापूूर आणि भिवंडी शहरात अवजड वाहनांना दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत वाहतुकीस परवानगी आहे. भिवंडी शहरात मोठ्याप्रमाणात गोदामे आहेत. त्यामुळे उरण येथील जेएनपीटी बंदरातून सुटणारी हजारो अवजड वाहने या मार्गावरून वाहतुक करतात. अवेळी वाहतुक रोखण्यासाठी या मार्गावर पोलिसांची पथके तैनात असतात.
परंतु या मार्गावर मध्यरात्री अवजड वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडून पैसे घेतले जात असल्याचा व्हिडियो आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. ‘रात्री मुंब्रा बायपास मार्गावर पैसे जमा करणारे हे कोण आहेत? दोन -दोन तास वाहतुक कोंडी असते’ असा प्रश्न त्यांनी सोशल मीडियावर ठाणे पोलिसांना केला आहे.