डोंबिवली - जीएसटीची रक्कम न भरल्याने शहरातील के.व्ही. पेंढरकर महाविद्यालयाने इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल रोखून धरला होता. विद्यार्थ्यांनी ४५० रुपये भरल्यावर त्यांना निकाल देण्यात आला. मात्र, याबाबत विद्यार्थ्यांनी ओरड केल्यानंतर स्टेशनरीचे पैसे घेतले असल्याचा खुलासा महाविद्यालयाने केला आहे.इयत्ता बारावीतील कला शाखेच्या विद्यार्थ्यांचा निकाल महाविद्यालयाने रोखून धरला होता. निकालाची प्रत हवी असल्यास जीएसटीची ४५० रुपयांची रक्कम भरावी लागेल, असे महाविद्यालयाचे म्हणणे होते. काही विद्यार्थ्यांनी ही रक्कम भरली, पण त्या बदल्यात त्यांना दिलेल्या पावतीवर ‘स्टेशनरी’ असा उल्लेख होता. त्यामुळे स्टेशनरीचे पैसे भरलेले असताना पुन्हा जीएसटीच्या नावाखाली पैसे घेऊन स्टेशनरीचे पैसे घेतल्याचे का दाखवले जात आहे, याविषयी विद्यार्थ्यांनी ओरड केली. याप्रकरणी एका विद्यार्थिनीने विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी सचिन दोंदे यांच्याशी संपर्क साधला. दोंदे यांनी महाविद्यालयात धाव घेत विचारणा केली असता त्यांनाही नीट माहिती देण्यात आली नाही.दरम्यान, शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी अभिजित थरवळ यांनी थेट महाविद्यालयाचे प्रभाकर देसाई यांच्याशी संपर्क साधला. विद्यार्थ्यांकडून जीएसटी वसूल केला जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.चुकून ‘जीएसटी’ उल्लेखयासंदर्भात पेंढरकर महाविद्यालयाने कळवले आहे की, शैक्षणिक शुल्क थकलेल्या विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयातील नोटीस बोर्डावर लावली होती. त्यात चुकून ‘जीएसटी’ असा उल्लेख झाला होता. मात्र, हे पैसे स्टेशनरीचे थकले होते. आता नव्या व जुन्या शैक्षणिक शुल्कांचा तपशील वेगवेगळ्या स्वरूपात कळवला आहे.
जीएसटीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून पैसेवसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 4:29 AM