ठाणे : दिव्याखाली मागील तीन वर्षांपूर्वी अंधार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले होते. तो अंधार अजून तसाच आहे. दिव्याबाबत सत्ताधारी आणि प्रशासनाचा दृष्टिकोन सकारात्मक नसून, या भागात भ्रष्टाचाराचे रान उभे राहिले असून, स्थानिक लोकप्रतिनिधी कामाच्या नावे टेंडर काढून पैसे उकळत असल्याचा आरोप मनसेचे आमदार प्रमोद (राजू ) पाटील यांनी बुधवारी ठाण्यात केला.दिव्यातील तीन ते चार कामांसह ओव्हर ब्रीजच्या कामाबाबत त्यांनी ठामपा आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी भेट घेऊन आढावा घेतला. ब्रीजच्या कामात इमारती, ४०० च्यावर घरे बाधित होणार आहेत. त्या बाधितांना कुठे घरे मिळणार आहेत, ब्रीज होणार आहे का? याची माहिती घेऊन तो दिव्याच्या बाहेरून ब्रीज करावा, अशी मागणी केली. तेव्हा आयुक्तांनी त्या कामाचे टेंडर निघाल्याचे सांगून, काही सूचना केल्या असून, त्याबाबत पालकमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.अधिकाऱ्यांसह करणार दिव्याचा दौरा दिव्यात सत्ताधारी आणि प्रशासनाचा दृष्टिकोन सकारात्मक नसल्याने अजून दिव्याखाली अंधार असल्याचे दिसत आहे. दिव्यात सध्या ४०० ते ८०० कोटींची कामे सुरू आहेत, पण ती कामे सुरू असल्याचे दिसत नाही. या कामांच्या फाइल घेऊन स्वतः महापालिका अधिकाऱ्यांसह दिव्याचा दौरा करणार असल्याचही त्यांनी स्पष्ट केले. दिव्याकडे डम्पिंग ग्राउंड म्हणून पाहिले जात आहे. ती ओळख दिव्यात भविष्यात चांगले कामे करून बदलण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याप्रसंगी मनसे शहराध्यक्ष रवींद्र मोरे उपस्थित होते.
"दिवा येथील लोकप्रतिनिधींकडून विकासकामांच्या आड होतेय वसुली"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 2:42 AM