ठाणे : ग्लोबलमधील कर्मचाऱ्यांचा पगार हवा तर कमी करा, परंतु त्यांना कामावर ठेवा अशी मागणी करून महापालिकेने जे कर्मचारी घेतले होते, त्यांना कमी करून ठेकेदार कर्नाटकमधून आलेल्या कर्मचाऱ्यांनाच सेवेत ठेवत असल्याचा आरोप भाजपने केला. आता या कर्मचाऱ्यांवर अन्याय केला तर संभाव्य तिसऱ्या लाटेच्या वेळेस कोणताही कर्मचारी काम करण्यास पुढे येणार नसल्याचा सूरही या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी लावला.
परंतु, महापालिकेकडून रुग्णांच्या संख्येनुसारच २५ टक्के निधी मिळत असल्याने सर्वांना कामावर सामावून घेणे शक्य नसल्याचे मत यावेळी संबंधित ठेकेदाराने व्यक्त केले. त्यामुळे आपली काम करण्याची इच्छाच नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. त्यावर महापौर नरेश म्हस्के यांनी जर दुसरा कोणी ठेकेदार तेवढ्याच पैशावर सर्व कर्मचाऱ्यांना सामावून घेणार असेल तर भाजपने तो देण्याची सूचना करून आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांची चांगलीच गोची केली. एकूणच तब्बल दोन तास चालेल्या या बैठकीत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली.