कासा/तलासरी : पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यांत पुन्हा भूकंपाचे हादरे बसले असून यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. या भूकंपात काही घरांची पडझड झाली असून अनेक गावांतील ग्रामस्थांना भीतीने रात्र घराबाहेर काढावी लागली. झोपड्यांपेक्षा पक्क्या घरांना तीव्रता अधिक जाणवली.
डहाणू तालुक्यात ४ आणि ५ सप्टेंबर रोजी एकूण चार भूकंपांचे धक्के बसले. त्यापैकी ४ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजून ४३ मिनिटांनी ४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या धक्क्याने ग्रामीण आणि किनारपट्टीतील गावांना मोठे हादरे बसले आहेत. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण असून काही ठिकाणी नागरिकांनी रात्र जागून काढली आहे.
४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजून ३३ मिनिटांनी २.८ तीव्रतेचा धक्का बसला होता. त्यानंतर रात्री ११ वाजून ४१ मिनिटांनी ४ रिश्टर तीव्रतेचा, १२ वाजून ५ मिनिटांनी ३.६ तीव्रतेचा आणि पहाटे ६ वाजून ३६ मिनिटांनी २.७ तीव्रतेचा धक्का बसला. ४ रिश्टर स्केलचा हा सर्वात मोठा धक्का होता. या सर्व भूकंप हादऱ्याची तीव्रता धुंदलवाडी, चिंचले, सासवंद, आंबोली, धानिवारी, ओसारविरा, महालक्ष्मी, सोनाळे, कासा, चारोटी, पेठ, उर्से आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांना जाणवली.
धुंदलवाडी येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. येथील स्थानिक संदीप भसरा, लक्ष्मण कुरकुटे, नरेश भोये यांनी सांगितले की, सकाळपर्र्यंंत ८ ते १० छोटे-मोठे धक्के बसले. त्यामुळे ग्रामस्थांनी मात्र भीतीने रात्र घराबाहेर काढली.दरम्यान, भूकंपाच्या हादºयाने तालुक्यातील सासवंद गावातील अंती धर्मा डोंबरे या आदिवासी शेतकºयाचे घर कोसळले, तर चिंचले गावातील दत्तू पडवळे यांच्या घराचा काही भाग कोसळून मोठे नुकसान झाले. सुदैवाने या दोन्हीही घटनेत कोणतीही जीवित हानी किंवा मोठी दुखापत कोणाला झाली नाही. तर काही गावातील घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत.
पंचनामे करण्याचे काम सुरू
1डहाणू प्रांताधिकारी आशिमा मित्तल, तहसीलदार राहुल सारंग आणि काही तालुका पंचायत समिती सदस्य यांनीविविध गावांमध्ये जाऊन पाहणी केली असून महसूल कर्मचाऱ्यांनी पंचनामे करण्याचे काम सुरू केल्याची माहिती तहसीलदार सारंग यांनी दिली.
2पालघर जिल्ह्यामध्ये३ नोव्हेंबर २०१८ पासून भूकंपाचे धक्के बसत असून आतापर्यंत हजारो घरांच्या भिंतींना तडे गेलेआहेत. एकीकडे कोरोना संकट तर दुसरीकडे भूकंपाची भीती या दुहेरी संकटात येथील नागरिक सापडले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.