ठाणे : प्लॅस्टिकचा पुनर्वापर करण्याच्या हेतूने ठाणे महानगरपालिका शाळा क्र. ५५ च्या विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिकच्या अनेक टाकाऊ वस्तू जमा केल्या आहेत.त्यात टाकाऊ प्लॅस्टिक पिशव्यांपासून अनेक नाविन्यपूर्ण वस्तू बनविण्यात आल्या. प्लॅस्टिकची रस्सी, चटई, पर्स, शोभिवंत फुले, तोरणे, माळा इ. वस्तू तयार झाल्या. दुधाच्या पिशव्यांचे गजरे, हार, फुले, तोरणे तयार झाली. बॉटल्स रंगवून त्यांचा वापर करून टेरेस गार्डन मध्ये विविध प्रतिकृती तयार करण्यात आल्या. ऑडिओ व्हिडीओ सीडीज आणि प्लॅस्टिकच्या शीट वर चिकटवून सुंदर अशी माशाची प्रतिकृती बनविण्यात आली.
पर्यावरण संरक्षण व संवर्धन यात सर्वात मोठे आव्हान ठरलेल्या प्लॅस्टिकचा विचार करता सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर टाळणे, वापर करून टाकाऊ प्लॅस्टिकचा पुनर्वापर करणे किंवा टाकाऊ प्लॅस्टिक पासून नवीन वस्तूंची पुनर्निर्मिती करणे हे महत्त्वाचे तीन मार्ग सापडतात. ठाणे महानगरपालिका शाळा क्र. ५५ च्या विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाचे धडे रुजविण्यासाठी शाळेकडून नेहमीच वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जातात. या विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिकच्या अनेक टाकाऊ वस्तूमध्ये सॉफ्ट ड्रिंक्सच्या प्लॅस्टिक बॉटल्स, दुधाच्या पिशव्या, प्लॅस्टिकच्या इतर सर्व प्रकारच्या पिशव्या, जुनी तुटलेली खेळणी, जुन्या ऑडीओ आणि व्हिडीओ सीडीज, जुने मोबाईल चार्जर्स, हेड फोन्स इ. इ. वस्तू जमा झाल्या. विद्यार्थ्यांनी एकमेकांशी व शिक्षकांशी चर्चा करत या प्लॅस्टिकचा पुनर्वापर करण्याचे ठरविले. एक एक नवीन संकल्पना साकारत गेल्या. विद्यार्थ्यांची कल्पकता, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि त्यामागची पर्यावरण रक्षणाची भूमिका यातून तयार झालेल्या या नाविन्यपूर्ण टाकाऊतून टिकाऊ वस्तूंची निर्मिती झाली. प्रतिकृतीचा साईज ३ × ४ फूट एवढा आहे. यात इयत्ता सहावी ते आठवीतील विद्यार्थी सहभागी झाले. या विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, सृजनशीलता, सौंदर्यदृष्टी, पर्यावरण प्रेम पर्यावरण संवर्धनाचा ध्यास वाढीस लागला असून ही मुले आपसूकच हे सारे काम दैनंदिन अभ्यासाव्यतिरिक्त करीत आहेत, असे त्यांच्या मार्गदर्शक व कृतीशील शिक्षिका नूतन बांदेकर यांनी सांगितले.