लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक असलेले अनंत तरे हे मातृ - पितृभक्त होते. आई - वडिलांनी त्यांच्या कपाळी टिळा (नाम) लावला होता. कपाळावरील हा लाल रंगाचा नाम हीच तरे यांची वेगळी ओळख होती. अगदी बाळासाहेबांनाही हा टिळा आवडत होता. शेवटपर्यंत तरे यांनी ही ओळख जपली. स्वर्गीय आनंद दिघे यांच्यानंतर `मातोश्री`चा विश्वास संपादन करणारे ते ठाण्यातील एकमेव नेेते होते. शिवसेनेत व ठाण्यात नवनेतृत्त्वाचा उदय झाल्यावर तरे यांचे महत्त्व कमी होत गेले. आज तर ते काळाच्या पडद्याआड निघून गेले.
ठाणे शहर हे आगरी कोळी यांचे प्राबल्य असलेल्यांचे शहर. शिवसेनेतून गणेश नाईक या आगरी समाजातील नेत्याने बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यावर आनंद दिघे यांनी हेतूत: तरे यांना राजकारणात पुढे आणले. सलग तीनवेळा तरे यांना ठाणे शहराचे प्रथम नागरिक होण्याचा बहुमान प्राप्त झाला होता. वाडवडिलांची पुण्याई अथवा राजकारणात वारसदारी नसतानाही एका सर्वसामान्य कोळी घरात जन्माला आलेल्या तरे यांनी अथक परिश्रम आणि शिवसेनेवरील निष्ठेने हे यश संपादन केले. श्रीरंग सोसायटीत राहणाऱ्या आणि माजीवडा इंग्लिश हायस्कूलमध्ये शिकलेल्या तरे यांनी बांधकाम व्यवसायात उत्तुंग यश प्राप्त केले होते. मात्र, शिवसेना या चार अक्षरांची जादू, बाळासाहेबांवरील निष्ठा आणि दिघे यांचे आकर्षण यापोटी त्यांनी राजकारणात उडी घेतली. १९९४च्या महापालिका निवडणुकीत अनंत तरे विक्रमी मतांनी निवडून आले. १९९२च्या दंगली व मुंबईतील बॉम्बस्फोट यामुळे तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस लोकांच्या नजरेतून उतरली होती व शिवसेनेला राज्याची सत्ता खुणावत होती. ठाण्यात सेनेला अजून गती मिळावी, या हेतूने चाणाक्ष आनंद दिघे यांनी व्यवसायाने बिल्डर असलेल्या अनंत तरे यांची महापौर पदावर निवड केली. तरे यांनीही हा विश्वास सार्थ केला. पुढे तरे बाळासाहेब यांच्या गळ्यातील ताईत बनले. तरे ज्या एकवीरा देवी संस्थानचे अध्यक्ष होते तीच ठाकरे कुटुंबाची कुलदेवता असल्याने तरे यांचे बाळासाहेबांशी ऋणानुबंध अधिक घट्ट झाले.
तिसऱ्यांदा महापौरपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर दिघे आणि त्यांच्यात एका मुद्द्यावरून मतभेद निर्माण झाले. दिघे हे कारागृहात असतांना तरे यांनी मातोश्रीसोबत आपली नाळ घट्ट जोडली. पुढे ते विधान परिषदेचे आमदार झाले. बाळासाहेबांचा प्रत्येक शब्द शीरसावंद्य मानून तरे यांनी राजकारण केले. रायगड जिल्ह्याशी कसलाही संबंध नसतांना तिथले संपर्कप्रमुख राहून निवडणूक लढवली होती. परंतु त्या निवडणुकीत निसटत्या मतांनी त्यांचा पराभव झाला. याच निवडणुकीच्या वेळी मतांच्या झालेल्या घोळामुळे तरे यांनी रागाच्या भरात एका अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली होती. रामशेठ ठाकूर यांच्यासारख्या बलाढ्य आर्थिक शक्ती असलेल्या नेत्याचाही त्यांनी निवडणुकीत मुकाबला केला. शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व उभे राहिल्यावर बाळासाहेबांच्या काळातील अनेक नेते बाजूला केले गेले. त्यात तरे यांचाही समावेश होता. परंतु त्यांना उपनेतेपदावरून दूर केले नाही. ठाण्याला आगरी- कोळी भुमिपुत्रांचे नेतृत्व नारायणराव कोळी यांच्यापासून अलीकडच्या देवराम भोईर, सुभाष भोईर, दशरथ पाटील यांच्यापर्यंत अनेकांनी दिले. मात्र, तरे हे आपली वेगळीच छाप पाडून गेले. कॅसलिमल येथील चौकात कोळी भवनाचे काम सुरू आहे. त्यासाठी तरे यांनी खूप पाठपुरावा केला. अर्थात तरे यांचे हे स्वप्न पूर्ण होईल तेव्हा पाहायला ते आपल्यात नसतील.
...........
वाचली