अजित मांडके , ठाणे : ठाण्यात क्लस्टर योजना ही ठाणेकरांसाठी चांगला पर्याय आहे. मात्र असे असले तरी शहरातील सुमारे ७ हजार इमारतींचा पुनर्विकास आजही रखडला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. काही ठिकाणी अरुंद रस्ते, टायटलचे वाद तर काही ठिकाणी जागा मालकांमध्ये असलेल्या वादांमुळे पुनर्विकास रखडला आहे. त्यातही जुन्या ठाण्यातील भागांचा यात मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचेही दिसून आले आहे.
ठाण्यात एकीकडे घोडबंदर भागात नव्याने विकास होत आहे, या भागात मोठ मोठी गृहसंकुले उभी राहत आहेत. तिकडे किसन नगर भागात क्लस्टरच्या माध्यमातून अनाधिकृत, धोकादायक इमारतींचा पुनर्विकास सुरु झाला आहे. परंतु असे असले तरी देखील आजही पुनर्विकासाचा मार्ग खडतरच असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. जुन्या ठाण्यातील अनेक इमारतींचा पुनर्विकास मागील कित्येक वर्षापासून रखडला आहे. त्यातही छोट्या इमारती असतील किंवा सिंगल इमारत असेल अशा इमारतींचा विकास देखील रखडला आहे. जुन्या ठाण्यातील अनेक भागातील रस्ते ६ मीटर पेक्षाही कमी आहेत. त्यामुळे पुनर्विकास करतांना अडचणी येत आहेत. त्यामुळे अशा अरुंद रस्त्यांमुळे विकासकाला अधिकचा एफएसआय देखील मिळत नसल्याने विकासक देखील काम करण्यास सहज तयार होत नसल्याचे चित्र आहे. तसेच काही ठिकाणी जागा मालकांमधील वाद, भावाभावांमधील वाद, टायटल क्लिअर नसणे यामुळे देखील पुनर्विकासाला बाधा येत असल्याचे दिसून आले आहे. परंतु या इमारतींचा पुनर्विकास कसा करता येऊ शकतो, त्यावर कशा पध्दतीने तोडगा काढता येऊ शकतो या उद्देशाने ठाणे एमसीएचआयने पाऊल उचलले असल्याची माहिती एमसीएचआय ठाणे क्रेडाईचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली.
घोडबंदरच्या कोंडीने रहिवासी दुसºया घरांच्या शोधात : घोडबंदरच्या वाहतुक कोंडीने येथील रहिवासी हैराण झाले आहेत. रोजच्या रोज या ना त्या कारणामुळे वाहतुक कोंडीत नव्याने भर पडत आहे. त्यामुळे येथील काही रहिवाशांनी आपली घरे विकून शहरात घरे घेतली असल्याची माहिती देखील समोर आली आहे. परंतु विकास कामे सुरु असल्याने वाहतुक कोंडी होत असल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले. परंतु पुढील सहा महिन्यात कोंडी सुटेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. काही प्रमाणात रहिवाशांना घरे विकून ठाण्यात आले असले तरी हे प्रमाण नगण्य असल्याचा दावाही त्यांनी केला.
पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार : घोडबंदर भागात सर्वाधिक प्रमाणात नवीन गृहसंकुलांची कामे सुरु आहेत. परंतु येथील पाण्याची समस्या आजही मार्गी लागू शकलेली नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी येथील रहिवाशांनी महापालिकेच्या जनसुनावणीत देखील हा मुद्दा अधोरेखीत केला होता. परंतु येत्या काही महिन्यात घोडबंदर भागातील पाण्याची समस्या सुटेल असा विश्वास एमसीएचआय ठाणेने व्यक्त केला आहे. परंतु सीसी न देणे अयोग्य असल्याचेही मतही व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे घर बुकींग करणाºया नागरीकांसह विकासकांचेही नुकसान होणार असल्याचे मेहता यांनी सांगितले. परंतु पाण्याची समस्या सोडविण्यासाठी ठाणे महापालिकेबरोबर विकासक देखील प्रयत्न करीत आहेत. या भागात संप, पंप आणि नवीन जलकुंभांची कामे सुरु आहेत. तसेच इतर वापरासाठी ट्रीटमेंट केलेल्या पाण्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे निश्चितच पाण्याची समस्या येत्या काही महिन्यात मार्गी लागेल असेही सांगितले जात आहे.