उल्हासनगर : ग्रामीण परिसरातील शासकीय रुग्णालय अद्यावत नसल्याने, मध्यवर्ती रुग्णालयावर रुग्णांचा अतिरिक्त भार पडल्याचा आरोप सामाजिक संघटनेने केला. त्यासाठी ग्रामीण रुग्णालय अद्यावत करण्याची मागणीने जोर पकडला आहे.
उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण ग्रामीण परिसरातून शेकडो रुग्ण उपचार करण्यासाठी येतात. अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, कसारा, खर्डी, गोवेली, शहापुर, मुरबाड आदी परिसरात शासकीय जिल्हा ग्रामीण रुग्णालय आहेत. मात्र तेथील रुग्णालय अद्यावत नसल्याने, तेथील नागरिक मध्यवर्ती रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येतात. बाह्यरुग्ण विभागात दररोज १८०० रुग्णांची नोंद होत असून ती संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहेत. २०० बेडच्यां मध्यवर्ती रुग्णालयात ३०० पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हाशल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली असून रुग्णालयावर अतिरिक्त भार पडत असल्याचे ते म्हणाले आहे.
मध्यवर्ती रुग्णालयातील रुग्णांची संख्या बघता ग्रामीण परिसरातील शासकीय रुग्णालय अध्यावत नसल्याने गर्दी होत आहे. असा आरोप महामाया असंगठित महिला कामगार संघटना, अँड वनिता ओवळेकर, द समर्पण फाउंडेशनचे प्रशांत चंदनशिवे यानी करून ईमेल द्वारे प्रशासनास याबाबत माहिती दिली आहे. जिल्हातील कोणत्याही रुग्णालयात १८०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद बाह्यरूग्ण विभागात नाही. शासनाच्या आरोग्य विभागाने मध्यवर्ती रुग्णालयातील रुग्णांची गर्दी पाहता, कळवा ठाणे येथील रुग्णालया प्रमाणे मदत करण्याची मागणीही होत आहे.