ठाणे : हेवेदावे करू नका आणि सोशल मीडियाचा वापर कमी करा, अशा कानपिचक्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी पदाधिकाऱ्यांना दिल्या. पत्रकारांनी स्वत:हून तुमच्या कामाची दखल घ्यायला हवी, अशी कामे करा, असा सल्लाही त्यांनी दिला.
राज ठाकरे यांनी बैठकीत पदाधिकाऱ्यांना अनेक सूचना केल्या आणि सल्ले दिले. आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक सीकेपी हॉल येथे संपन्न झाली. यावेळी प्रभाग अध्यक्षपद रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय त्यांनी जाहीर केला. ते म्हणाले की, प्रभाग अध्यक्षपदी दुसरा पर्याय देणार असून, पुण्यात जसा पर्याय निवडला, तसाच ठाण्यात निवडणार. ठाणे महापालिकेत १३० विद्यमान नगरसेवक आहेत. तेवढेच शाखा अध्यक्ष नियुक्त केलेले असायला हवे. जास्त शाखा अध्यक्ष वाढवत बसू नका. शाखा अध्यक्ष हाच पक्षाचा कणा आहे. विनाकारण पदे वाटलीत, तर दिसायला भारंभार पदाधिकारी दिसतात. मात्र काम करायला कुणीच नसते. ठाण्यातील मनसेमधील वाढत्या गटबाजीचीही राज यांनी गांभीर्याने दखल घेतली. एकमेकांशी हेवेदावे न करता एकमेकांशी जोडून राहा. नव्याने पक्षबांधणी करा, निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना नारळ द्या. मनसे कसा बळकट होईल, याचा विचार करा आणि त्यादृष्टीने मेहनत करा, अशा शब्दांत त्यांनी मार्गदर्शन केले.
.........
वाचली
वाचली