ठाणे : जिल्ह्यात सर्व शिक्षा अभियानाद्वारे ग्रामीण भागातील शाळांना संजीवनी मिळाली आहे. त्याद्वारे नवी शाळागृहे, शाळांभोवती संरक्षक भिंत, नवी शौचालये, आदींसाठी निधी उपलब्ध होत असे. परंतु, आता केंद्र शासनाने या अभियानाऐवजी २०१८ पासून ‘समग्र शिक्षा अभियान’ सुरू केले आहे. मात्र, या अभियानापासून या शाळांच्या निधीत केंद्र सरकारने कपात केल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांचा विकास करण्यात अडचणी येत आहेत. याकडे लक्ष केंद्रित करून समग्र शिक्षा अभियानाच्या निधीत भरघोस वाढ करावी, असे साकडे ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, यांनी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांना घातले आहे.
रविवारी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमासाठी पाटील ठाण्यात आले होते. यावेळी पवार यांनी ‘समग्र शिक्षा अभियान’ला फारसा निधी मिळत नसल्याचे वास्तव लक्षात आणून दिले. या अभियानाच्या निधीत केंद्राने कपात केल्यामुळे शाळांची आवश्यक कामे करणे शक्य होत नाही. प्रसंगी जिल्हा परिषद स्वनिधी वापरून ती करावी लागत आहेत. या कामांसाठी सरकारने भरीव मदत मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील शिक्षकांनी कोरोनाच्या काळात उत्तम पद्धतीने काम केले. शिक्षकांना कोणतीही अडचण भेडसावू नये, यासाठी जिल्हा परिषदेने एक वेतनश्रेणी द्यावी, अशी मागणीही पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे सध्या लावून धरली आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त विजेत्यांना रोख रक्कम वा वस्तू देण्यासाठी पुढील वर्षी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यासाठी पवार यांनी पाठपुरावा सुरू केला आहे.