ठाणे : ठाण्यात सहपोलीस आयुक्त म्हणून काम करताना वेगवेगळ्या आघाड्यांवर परिश्रम घेतले. वेळ फार कमी मिळाला; पण मागे वळून बघितले, तर समाधानाची भावना निर्माण होते. अतिशय कमी वेळेत ठाण्यातील गुन्ह्यांचा आलेख कमी करता आला. दीड वर्षाच्या परिश्रमाचे हेच फलित असल्याची भावना ठाण्याचे मावळते सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश शासनाने गुरुवारी जारी केले. डुंबरे यांची बदली मुंबई शहरात आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. राज्याच्या राजधानीत काम करण्याचा अनुभव आयुष्यात एकदा तरी मिळावा, असे सर्वच अधिकाऱ्यांना वाटते. या बदलीमुळे डुंबरे यांची ती इच्छा पूर्ण होणार असली, तरी ठाणेकर एका मनमिळाऊ, परिश्रमी आणि तेवढ्याच कुशल अधिकाऱ्याला मुकणार आहेत. पोलीस आयुक्तालयात कधीही हमखास भेटणाऱ्या आणि तक्रारदारांचे पूर्ण समाधान करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक असलेल्या डुंबरे यांनी त्यांच्या दीड वर्षाच्या कार्यकाळात विविध आघाड्या उत्तम हाताळल्या. नोकरी सेंटरच्या माध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी धडपडणारे डुंबरे कामचुकार कर्मचाऱ्यांसाठी तेवढेच कठोर दिसून आले. त्यांच्याच नेतृत्वाखाली ठाणे पोलिसांनी बोगस कॉल सेंटरपासून सैन्य भरती, पेपरफुटीसारखे मोठमोठे घोटाळे कुशलपणे उघडकीस आणले. ठाण्यातील गुन्ह्यांचा आलेख झपाट्याने वाढत असताना तो तब्बल २0 टक्क्यांनी कमी करण्यात त्यांना यश आले. अल्पावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुन्हे कमी करणारे ठाणे एकमेव शहर ठरले. नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना, कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास आणि महत्त्वाचे म्हणजे पोलिसांचे अस्तित्व ठाणेकरांना दाखवून देण्याचे काम केले, याबाबत डुंबरे यांनी समाधान व्यक्त केले. (प्रतिनिधी)ठाणेकरांच्या अपेक्षापूर्तीचे समाधान -ठाणे : ठाण्यातील अडीच वर्षांच्या कार्यकाळात सर्वच आघाड्यांवर काम करण्याची संधी मिळाली. उपायुक्त म्हणून काम करताना ठाणेकरांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्याचे समाधान शब्दांत सांगण्यापलीकडे असल्याचे ठाण्याच्या मावळत्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर म्हणाल्या.डॉ. करंदीकर यांची मुंबई शहरात पोलीस उपायुक्त म्हणून गुरुवारी बदली झाली. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्या नवीन ठिकाणी रुजू होणार आहेत. डॉ. करंदीकर यांनी त्यांच्या कार्यकाळातील विविध योजनांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, ठाण्याच्या वाहतूक शाखेची धुरा सांभाळणे कठीण काम होते. पण, ती यशस्वीपणे सांभाळली. त्यांच्याच कार्यकाळात ठाण्याच्या वाहतूक शाखेला आयएसओ मानांकन मिळाले. हे मानांकन मिळवणारी ठाण्याची वाहतूक शाखा देशातील पहिली ठरली. २०१४ मध्ये साकेत पुलाचे काम महापालिकेने हाती घेतले होते. या पुलावरून दररोज जवळपास दीड लाख वाहनांची वाहतूक होत असते. जवळपास २ वर्षे या वाहतुकीचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य डॉ. करंदीकर यांनी दाखवले. प्रवाशांच्या, विशेषत: महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठाण्यातील ३४ हजार रिक्षांना स्मार्ट ओळखपत्रे देण्यात आली. त्यातून या रिक्षांची माहिती पोलीसदफ्तरी संकलित झाली. याचे बरेच फायदे झाले. प्रवासी रिक्षेत पैसे अथवा सामान विसरले, तर रिक्षाचालक परत देऊ लागले. या उपक्रमाचे ठाणेकरांनी मनस्वी कौतुक केले. मुख्यालयाची जबाबदारी सांभाळताना पोलीस आयुक्त, सहआयुक्तांच्या मार्गदर्शनात अनेक अभिनव योजना राबवता आल्या.
कमी काळात गुन्ह्यांचा आलेख घटवल्याचे समाधान!
By admin | Published: April 29, 2017 1:40 AM