डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले हटवले असून त्यांना त्यात चांगले यश आले आहे. याच संधीचे परिवहन विभागाने सोने करावे आणि रेल्वे स्थानक परिसरातून बस सुविधा द्यावी अशी अपेक्षा डोंबिवलीकरांनी व्यक्त केली. पण त्यात केडीएमटी प्रशासनाच्या इच्छाशक्तीचा आभाव दिसून येत आहे. त्याचा लाभ मात्र पसिररातील रिक्षा चालकांनी घेतला असून तेथे अनधिकृत स्टँड होण्याआधीच लक्ष घालण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला डॉ. राथ रोड आणि पाटकर रोड परिसरातील फेरिवाले महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हटवले. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान असले तरीही स्थानकातून बस सुविधा मिळत नसल्याने कही खुशी कही गम असे वातावरण आहे. फेरिवाल्यांसह गर्दीमुळे स्थानक परिसरात बस आणता येत नाही असे स्पष्टीकरण परिवहन विभागाने दिले होते, पण आता तर फेरिवाले आभावानेच दिसत आहेत. त्यामुळे तेथे तात्काळ बस सुविधा द्या अशी मागणी विविध प्रवासी संस्था, नागरिक व्यक्त करत आहेत. ही सुविधा दिल्यास रिक्षाचालकांची मुजोरी कमी होण्यास मदत होईल. तसेच घाटकोपरप्रमाणे स्थानकातून बस सुविधा देणे सोपे होईल.
पण केडीएमटी प्रशासन याकडे कानाडोळा करत असून दक्ष नागरिकांनीही या संधीकडे दूर्लक्ष केले आहे का असा सवाल ज्येष्ठ नागरिक करत आहेत. अद्यापही केळकर रोडच्या कॉर्नवरुनच शहरात बस सोडल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांना रेल्वे स्थानकातून उतरल्यावर बरेच अंतर पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे ही सुविधा तातडीने द्यावी यासाठी परिवहन सभापती संजय पावशेंनी लक्ष घालावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.शिवसेनेचे माजीशहरप्रमुख भाऊ चौधरी यांनी रेल्वे स्थानक परिसरातून बस सोडण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. पण ते यशस्वी झाले नाहीत.
पश्चिमेला बस रेल्वे स्थानकातून सोडण्यासाठी मधल्या पादचारी पूलाचे प्रवेशद्वार तोडण्यात आले, पण अल्पावधीतच तेथिल ७१, ७२ क्रमांकाची बस बंद झाली. त्यामुळे प्रवेशद्वार खुले झाले, पण बस मात्र नाही अशी स्थिती असल्याने नागरिका नाराज आहेत. केडीएमटीच्या अशा दुटप्पी भूमिकेमुळे डबघाईत जाणारी परिवहन सेवेला चांगले दिवस येणार तरी कसे अशी टिका नागरिकांनी केली. परिवहन प्रशासन आणि सत्ताधा-यांमध्ये इच्छाशक्तीचा आभाव असल्यानेच फेरिवाले हटल्याचा फायदा रिक्षाचालक घेत आहेत. यासंदर्भात केडीएमटीचे व्यवस्थापक देवीदास टेकाळे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
मोठ्या बसेस स्थानक परिसरातून येत नाहीत, मिडी येतात. नागरिकांची तशी मागणी असेल तर छोट्या बसेस रेल्वे तिकिट घराबाहेर उभ्या करण्यासाठी बसस्टँड कसा करता येतो यासाठी परिवहन व्यवस्थापक देवीदास टेकाळेंशी चर्चा करतो - संजय पावशे, सभापती, परिवहन समिती
डॉ. राथ रोडवरुन मिडी बस समजा भरुन आली तर ती केळकर रोड, पाटकर रोडला येत असतांना आधीच बस असेल तर स्टेशनकडुन आलेली बस ओव्हरटेक होऊ शकत नाही. त्यासाठी आयुक्त पी.वेलारसू यांच्याशी बोलणे सुरु आहे - प्रमोद केणे, प्रोटेस्ट अगेन्स्ट आॅटोवाला मंच