ठाणे : ‘महाबीज’च्या दप्तरी कोणतीही नोंद न घेता, सुमारे १५ लाख रुपयांच्या बियाण्यांची परस्पर विक्री करून, शासनाचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली ‘महाबीज’चे ठाण्याचे तत्कालीन उपविभागीय व्यवस्थापक तथा जिल्हा व्यवस्थापक अरविंद तपासे यांच्याविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला.महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या ठाणे जिल्हा कार्यालयामध्ये अरविंद तपासे हे आॅगस्ट २००९ ते आॅगस्ट २०१६ या कालावधीत उपविभागीय व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. जुलै २०१४ ते फेब्रुवारी २०१६ या कालावधीत वेळोवेळी झालेल्या जिल्हा व्यवस्थापकांच्या विभागीय आढावा बैठकीमध्ये, ठाणे कार्यालयाच्या अहवालांमध्ये त्रुटी आढळून आल्या. जिल्ह्याला पुरवठा झालेले एकूण बियाणे, त्यांची विक्री, विक्रीतून झालेली वसुली आणि शिल्लक साठा आदी तपशील जिल्हा कार्यालयांच्या अहवालामध्ये असणे अनिवार्य असते. ठाणे जिल्ह्याच्या अहवालांमध्ये असलेल्या त्रुटी ‘महाबीज’चे पुणे येथील विभागीय व्यवस्थापक अरविंद सोनोने यांनी वारंवार तपासे यांच्या निदर्शनास आणून देऊन त्याविषयी खुलासाही मागविला. मात्र, तपासे यांचे स्पष्टीकरण समाधानकारक न आढळल्याने, अरविंद सोनोने यांनी २६ फेब्रुवारी २०१६ रोजी ही बाब ‘महाबीज’च्या अकोलास्थित मुख्यालयाच्या वित्तविभागाच्या महाव्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिली. महाव्यवस्थापकांनी या प्रकाराची तातडीने दखल घेऊन, ‘महाबीज’च्या उपमहाव्यवस्थापकास ठाणे जिल्हा कार्यालयाच्या अंतर्गत अंकेक्षण करण्याचे आदेश ८ मार्च २०१६ रोजी दिले. या अंतर्गत अंकेक्षणाचा अहवाल १७ जानेवारी २०१७ रोजी ‘महाबीज’च्या व्यवस्थापकीय संचालकांपुढे सादर केला. २०१४-१५ आणि २०१५-१६ या कालावधीतील ठाणे जिल्हा कार्यालयातील बियाण्यांचा साठा, सांगली आणि नाशिक कार्यालयास पाठविलेले बियाणे, तसेच निविदेद्वारे विकलेला बियाण्यांचा साठा याविषयीच्या आकड्यांमध्ये तफावत आढळल्याचे अहवालामध्येम्हटले होते. विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण बियाण्यांचा साठा आणि परतावा याविषयीच्या आकड्यांमध्ये २०१४-१५ मध्ये १०१.८६ क्विंटलची तफावत आढळली. २०१५-१६ या आर्थिक वर्षात ही तफावत ३२५.०४ क्विंटलवर पोहोचली. एकूण ४२६.९० क्विंटल बियाण्यांची ही तफावत असून, त्याची रक्कम १४ लाख ९० हजार ५८९ रुपये १० पैसे एवढी होते. पुरेसा अवधी देऊनही तपासे या संदर्भात समाधानकारक खुलासा देऊ शकले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध रीतसर फौजदारी तक्रार करण्याचा निर्णय ‘महाबीज’ने घेतला.आरोपीचा शोध सुरूअरविंद तपासे यांच्याविरुद्ध घोळाची आणखी एक तक्रार असल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली. त्यांना काही महिन्यांपूर्वी याच कारणास्तव निलंबित करण्यात आले होते. ‘महाबीज’कडून रीतसर तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नोंद न घेता बियाण्यांची परस्पर विक्री, ‘महाबीज’च्या उपविभागीय व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 12:26 AM