भिवंडी: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आरपीआय एकतावादी पक्ष ऍक्टिव्ह मोडमध्ये आला असून आरपीआय एकतावादीचा प्रदेश कार्यकर्ता मेळावा शहरातील नागाव गायत्री नगर येथे पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष विकास निकम यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी संपन्न झाला.
या मेळाव्यात लोकसभा निवडणुकी संदर्भात पक्षाची भूमिका ठरविण्यात आली.तसेच राज्यातील विविध जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्या व नवीन कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश यावेळी करण्यात आला.या मेळाव्यास राष्ट्रीय युवाध्यक्ष भैय्यासाहेब इंदिसे ,युवा प्रदेशाध्यक्ष दयासाहेब इंदिसे,राष्ट्रीय सरचिटणीस प्रल्हाद सोनवणे,दिल्ली येथील पदाधिकारी दौलतराम गौतम,शहराध्यक्ष मेहबूब पाशा,सुरेश म्हस्के,एल पी गायकवाड,मंजुलाताई यादव ,अँड चांदबी मुजावर यांच्यासह शहर व विविध जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.या कार्यक्रमा प्रसंगी अनेक कवींनी आपल्या प्रबोधनपर कवितांचे सादरीकरण केले.तर प्रसिद्ध गायक चंद्रकांत शिंदे यांनी बहारदार भिम गीतांचा कार्यक्रम यावेळी सादर केला.
अनेक वर्षापासून आपण राजकारण अत्यंत जवळून पाहिले आहे, मात्र सध्या राज्यात व देशात जे राजकारण चालले आहे ते अत्यंत चुकीचे राजकारण सुरू आहे. व्यक्ती केंद्रित राजकारणामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत असून आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये धर्मांध शक्तीच्या विरोधात आरपीआय एकतावादी पक्ष कार्यरत असेल अशी भूमिका पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी यावेळी व्यक्त केली. तर आरपीआय एकतावादी पक्ष राज्यभर बळकट करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून लवकरच राज्यभर दौरा करून पक्षाची मोट बांधण्यात येईल अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष माजी नगरसेवक विकास निकम यांनी दिली आहे.