डोंबिवली : कल्याण परिमंडळातील २० लाख १३ हजार ग्राहकांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकांची नोंदणी महावितरणकडे केली असून, या ग्राहकांना रीडिंग, वीजबिलाचा तपशील तसेच वीजपुरवठा बंद असण्याचा कालावधी यासह विविध माहिती ह्यएसएमएसह्णद्वारे पाठविण्यात येत आहे. परिमंडळातील उर्वरित चार लाख ६८ हजार वीजग्राहकांनीही आपल्या मोबाइल क्रमांकांची नोंदणी करून उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी गुरुवारी केले.महावितरणच्या कल्याण परिमंडळात कृषीपंप ग्राहकवगळता घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर असे एकूण २४ लाख ८२ हजार वीजग्राहक आहेत. यातील जवळपास ८१ टक्के ग्राहक मोबाइलनोंदणीच्या माध्यमातून महावितरणशी जोडले आहेत. या ग्राहकांना मीटर रीडिंग घेतल्यानंतर काही तासांत रीडिंग घेतल्याची तारीख, वेळ, सध्याचे एकूण युनिट व वापरलेले विजेचे युनिट याचा तपशील असणारा संदेश महावितरणकडून पाठविण्यात येतो. यात विसंगती आढळल्यास तक्रार करण्यासाठीचा टोल फ्री क्रमांक १९१२ हा शेवटी नमूद करण्यात आलेला असतो.या तपशिलाची पडताळणी करून चुकीच्या नोंदीबाबत वेळीच तक्रार करण्याची सुविधा याद्वारे ग्राहकांना मिळते. याशिवाय, नियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणारा वीजपुरवठा व वीजपुरवठा खंडित राहण्याचा कालावधी, याबाबत आगाऊ माहिती देणारा संदेश ग्राहकांना पाठविण्यात येत असल्याचा दावा महावितरणने गुरुवारी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला.तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे वीजपुरवठा बंद झाल्याची व हा पुरवठा केव्हा पूर्ववत होऊ शकेल, याची माहितीही संदेशाद्वारे ग्राहकांना पाठविण्यात येते. त्यासाठी ग्राहकांनी नोंदणीकृत मोबाइल बंद असेल, चुकीचा असेल किंवा क्रमांक बदलला असल्यास नवीन क्रमांक प्राधान्याने अद्ययावत करावेत, असे आवाहन अग्रवाल यांनी केले आहे. अनेकांना मोबाइल क्रमांक देऊनही संदेश जात नाहीत, अशा तक्रारी आल्या असून त्याचे निराकरण करण्यात येणार असल्याचेही महावितरणने स्पष्ट केले आहे.असा नोंदवा मोबाइल क्रमांकनोंदणी करावयाच्या मोबाइल क्रमांकावरून एमआरईजीनंतर स्पेस द्यावा व त्यानंतर आपला १२ अंकी ग्राहक क्रमांक टाइप करून ९२२५५९२२५५ या क्रमांकावर एसएमएस पाठवावा. या एका ‘एसएमएस वरून ग्राहकाच्या मोबाइलची नोंदणी होते. याशिवाय, महावितरणच्या संकेतस्थळ, मोबाइल अॅपवरूनही मोबाइलची नोंदणी करता येते.
२० लाख १३ हजार वीजग्राहकांनी केली महावितरणकडे मोबाइल नंबरची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 11:50 PM