ठाणे: मधुमेहग्रस्त रुग्णांनी नेत्र तपासणी करणे महत्त्वाचे आहे. ज्यांना मधुमेह होऊन पाच ते सहा वर्षे झाले त्यांनी नियमीतपणे डोळ््यांच्या पडद्याची तपासणी करावी. जसे आपण रक्त तपासणी नियमीत करतो तसे नेत्र तपासणी देखील करावी असे मत नेत्रतज्ञ डॉ. दिलीप गायतोंडे यांनी व्यक्त केले. अत्रे कट्ट्यावर ‘मेरी आँखों के सिवा...’ या शिर्षकांतर्गत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी सहभागी नेत्रतज्ञांनी नेत्र तपासणीचे महत्त्व तर सांगितले पण मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा, लहान मुलांच्या डोळ््यांची तपासणी आदी मुद्द्यांना देखील हात घातला. मधुमेहग्रस्तांनी डोळ््यांची तपासणी करणे महत्त्वाचे आहे कारण त्यात रक्तवाहिन्या पाहता येतात. शुगरमुळे डोळ््यांच्या पडद्यात बदल होत असतात. त्यामुळे रक्तवाहीन्या ब्लॉकही होतात. त्यामुळे मधुमेहग्रस्तांनी शुगर नियंत्रीत ठेवून दररोज शारिरीक व्यायाम करावा आणि वर्षातून एकदा तरी डोळ््यांच्या पडद्याची तपासणी करण्याचा सल्ला डॉ. गायतोंडे यांनी दिला. डॉ. मिथीला गायतोंडे नेगलू यांनी तिरळेपणावर सांगितले. त्या म्हणाल्या, लहान मुलांचे डोळे तिरळे असतील तर लहान वयात डोळ््यांची तपासणी केली पाहिजे. मुल पाच वर्षांचे झाल्यावर डोळ््यांची तपासणी करावी असे नसते, अगदी नवजात बालकांंचे डोळे तपासण्यास हरकत नसते. डोळ््यांच्या तक्रारी असेल तरच डोळ््यांची तपासणी करावी असे नाही. तक्रारी नसतील तरी नेत्र तपासणी करावी. मर्यादेपेक्षा जास्त वेळ मोबाईल, संगणक हाताळला, टीव्ही पाहीला तर लहान वयातच मुलांना चष्मा लागू शकतो. याची काळजी घेणे आवश्यक आहे. डॉ. केतकी गायतोंडे - बुवारिया यांनी सांगितले की, काचबिंदूमध्ये डोळ््यांचा दाब वाढतो आणि नसा खराब होतात. त्याने बाजूची दृष्टीही कमी होते, नजर हळूहळू कमी होते पण ते लक्षात येत नाही. काचबिंदूमध्ये डोळ््यांचे जे नुकसान होते ते भरु शकत नाही पण डोळ््यांची जी नजर राहते ती टिकवू शकतो आणि पुढचे दुष्परिणाम टाळू शकतो, त्यासाठी डोळ््यांचे दाबही तपासावे. तारुण्यात डोळ््यांचे लेन्समध्ये पारदर्शीपणा असतो. पण वय वाढत गेल्यावर जेव्हा तिथे पांढरा रंग येतो तेव्हा त्याला मोतीबिंदू म्हणतात. त्यावर औषधे नसली तरी धुम्रपान करणाऱ्यांनी ते टाळावे आणि शुगर देखील नियंत्रीत ठेवावी.