लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : रस्ता रुंदीकरणानंतर गावदेवी भागात महापालिकेने पुनर्वसन केलेल्या २८ गाळ््यांवर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बेकायदा हातोडा टाकल्याने आमच्यावर अन्याय झाला असून आमचे त्याच जागी पुनर्वसन करा. अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात आम्ही दाद मागू, असा इशारा या गाळेधारकांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली महापौर मीनाक्षी शिंदे यांनी भेट घेऊन दिला.गाळेधारकांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, फेरीवाल्यांवरील कारवाईला आमचा विरोध नाही. मात्र अधिकृत गाळेधारकांच्या विरोधात अशा पद्धतीने सूडबुद्धीने कारवाई करणे चुकीचे आहे. तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी रस्ता रुंदीकरण करताना गाळेधारकांना गावदेवी येथे जागा दिल्या होत्या. परंतु, अचानक त्यांच्यावर कारवाई केल्याने २८ गाळेधारकांच्या कुटुंबातील सुमारे १०० लोकांवर उपासमारीची पाळी आली आहे. महापालिकेने स्वखर्चाने आमचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करावे, अशी मागणी गाळेधारकांनी केली. यासंदर्भात लागलीच शहर विकास विभागाचे अधिकारी प्रदीप गोईल यांना पाचारण करण्यात आले असता, त्यांनी सांगितले की, त्यांचे पुनर्वसन त्या ठिकाणी करता येणे शक्य नाही, कारण हा डीपी रस्ता असून जलकुंभासाठीच तो राखीव आहे. त्यामुळे व्यापारी आणि राष्ट्रवादीचे नेते परांजपे संतप्त झाले. ज्यावेळी डीपी प्लान तयार झाला त्यावेळी हा आक्षेप का घेतला नाही. डीपी प्लाननुसार रस्ता रुंदीकरण करताना ही बाब पालिकेच्या निदर्शनास आलीच असेल, असे असताना मग त्यावेळी महापालिकेकडून अनधिकृतपणे पुनर्वसन झाले कसे, असा सवाल गाळेधारकांनी केला. पालिकेने पुनर्वसनास परवानगी देणारा ठराव महासभेत मंजूर केल्यानंतर हे गाळे आम्हाला दिले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यदाकदाचित पुनर्वसन बेकायदा झाले असेल तरीही या गाळ्यांवर कारवाई करण्यापूर्वी तसा प्रस्ताव पुन्हा महासभेसमोर आणणे गरजेचे होते, असे मत यावेळी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी व्यक्त केले. जलकुंभ असल्याने त्या ठिकाणी गाळे देता येऊ शकत नाहीत. मग, पालिकेने सिद्धेश्वर तलाव येथील जलकुंभाच्या ठिकाणी वृक्ष प्राधिकरणाचे कार्यालये, खारेगावात पार्किंगच्या जागेच्या आरक्षणावर एसटीपी प्लांट उभारला कसा, असे सवाल या वेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केले आहेत. त्यामुळे पालिकेने ही कारवाई केवळ सूडबुद्धीने केली असून ही केवळ एक स्टंटबाजी असल्याचा आरोप मिलिंद पाटील यांनी केला. त्यामुळे याचा आम्ही निषेध करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. या गाळेधारकांचे पुनर्वसन झाले नाही, तर पालिकेविरोधात रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला.फेरीवाल्यांवर कारवाई करताना कायदा हातात घेणे चुकीचे असून पालिका आयुक्तांना हे शोभत नसल्याची भावनादेखील त्यांनी या वेळी व्यक्त केली. त्यामुळे ज्यांना मारहाण झाली असेल, त्यांनी पुढे यावे आणि पालिकेच्या या कारवाईविरोधात न्यायालयाकडे दाद मागावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. यामुळे हे प्रकरण चिघळण्याची चिन्हे आहेत.मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईत अनेकांना मारहाण झाली, गावदेवी येथील पुनर्वसन केलेले गाळे पालिकेने तोडले. पोलीस तक्रार घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे याविरोधात २० मे च्या महासभेत विरोधक आक्रमक होणार असून त्या गाळेधारकांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी करण्यासाठी आग्रही मागणी करणार आहेत.
गावदेवीतच पुनर्वसन करा
By admin | Published: May 16, 2017 12:14 AM