डोंबिवली - परिसरातील डीएनसी भागातील सुनील नगर, पी. एस. म्हात्रे कंपाउंडमधील अधिकृत ओम शिव गणेश इमारतिच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना खचल्याने २३ कुटुंबीय बेघर झाली आहेत. या पार्श्वभूमीवर आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी इमारतीचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यात येईल अशी माहिती दूरध्वनीद्वारे दिली आहे. आमदार सुभाष भोईर, महापौर राजेंद्र देवळेकर, शहरप्रमुख सभागृह नेते राजेश मोरे, महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली त्यावेळी इमारतीच्या कागदपत्रांची छाननी करून तसेच इमारतीचा प्लॅन पास करून पुनर्रबांधणी करीता मंजुरी देण्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले. डोंबिवली सुनील नगर येथील ओम शिव गणेश इमारतीचे काम सुरु असताना काल अचानक इमारतीच्या पिलरला तडे गेल्याने रहिवासी भयभीत झाले. ही इमारत राहण्यायोग्य नसल्याने तातडीने नागरिकांनी इमारत खाली केली. मात्र रहिवाशांच्या राहण्याचा प्रश्न आल्याने माजी नगरसेवक पप्पू म्हात्रे व राजन मराठे यांनी रहिवाशांना एकता नगर येथील रात्र निवारा केंद्रामध्ये काही जणांची राहण्याची व्यवस्था केली आहे. काही जण शेजारी राहण्यास गेले आहेत तर काही जणांनी भाडेकरारावर राहण्यास तयार झाले आहेत. तळ अधिक तीन मजले असलेल्या या इमारतीमध्ये २३ कुटुंबे वास्तव्यास होती. सन १९९१ मध्ये बांधण्यात आलेली ही इमारत २७ वर्षे जुनी होती. सर्वे नं. ६३ आयरे गावच्या हद्दीत असलेली ही अधिकृत इमारत आहे. या इमारतीच्या दुरुस्तीचे काम चालू असताना अचानक पिलारला तडे गेल्याने इमारत खचल्याचे निदर्शनास आले व रहिवाशांनी इमारत खाली केली आहे. या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली असून परत इमारतीमध्ये भीतीच्या दडपणाखाली राहण्याची त्यांची तयारी नाही. त्यामुळे रहिवाशांनी इमारतीचे पुनर्वसन करण्याची मागणी केली असता. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीद्वारे झालेली चर्चेनुसार रहिवाशांचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच इमारत पडण्यापूर्वी रहिवाशांची राहण्याची व्यवस्था तसेच प्लॅन मंजूर करून टीडीआर देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात यावा असे पालकमंत्र्यांनी सांगितले. त्यावेळी आयुक्तांनी इमारतीचे कागदपत्र तपासून तातडीने पुनर्वसन करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. यावेळी स्थानिक नगरसेविका ज्योती राजन मराठे, उपविभागीय अधिकारी उकिर्डे, तहसीलदार अमीत सानप, माजी नगरसेवक पंढरी पाटील, प्रकाश म्हात्रे, रवी म्हात्रे, परिवहन सदस्य, मनोज चौधरी, योगेश म्हात्रे, अभिजित सावंत, विकास देसले, जगदीश जुलूम प्रभाग अधिकारी कुमावत यांच्यासह नागरिक पदाधिकारी उपस्थित होते.