- राजू काळे
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी १८ नोव्हेंबरपासुन भाजपा सत्ताधा-यांच्या अपेक्षित कारभाराला सुरुवात केल्याने महापौरांनी दिलेला असहकार्याचा इशारा मागे घेऊन सोमवारी आपल्या दालनात उपस्थित राहणे पसंत केले. आयुक्तांचा हा सुधारीत कारभार पुढेही अपेक्षित असून मात्र त्यासाठी ८ दिवसांची मुदत महापौरांनी आयुक्तांना दिली आहे.
शहरात मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामे होत असून त्यावरील कारवाईसाठी आपल्यासह अनेक नगरसेवकांनी कित्येकदा तक्रारी करुनही आयुक्तांनी त्याची दखल घेतली नसल्याचा आरोप महापौरांनी आयुक्तांवर केला. आयुक्तांच्या अशा कारभारामुळे अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच महापौर दालनात शहरातील विकासकामांच्या मुद्यावर बैठका आयोजित केल्यानंतरही आयुक्त आपल्या कार्यालयात उपस्थित असताना बैठकीला उपस्थित रहात नाही. अनेकदा महासभा व महापुरुषांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाला देखील ते उपस्थित रहात नसल्याचा दावा महापौरांनी करुन आयुक्तांच्या कारभाराचे वाभाडे त्यांनी थेट १७ नोव्हेंबरच्या पत्रकार परिषदेत काढले. यामुळे व्यथित झालेल्या आयुक्तांनी महापौरांच्या आरोपांचे खंडन करण्यासाठी खुलासा जाहिर केला. तद्नंतर आयुक्तांऐवजी उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी महापौरांना दिलेला इशारा मागे घेण्याचे लेखी आवाहन केले. मात्र राजशिष्टाचाराप्रमाणे ते पत्र आयुक्तांनी देणे योग्य असतानाही उपायुक्तांनी केलेल्या उल्लंघनाप्रकारणी त्यांच्यावर कारवाईची मागणी महापौरांनी आयुक्तांकडे केली. भाजपा सत्तेत असतानाही प्रशासन त्यांचे ऐकत नसल्यानेच महापौरांनी आयुक्तांच्या कारभारावर अविश्वास दाखविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. दरम्यान आयुक्तांनी गुंडाळलेली तोडक कारवाई १८ नोव्हेंबरपासुन पुन्हा सुरु केली. तसेच प्रभाग समिती क्रमांक ६ मधील वादग्रस्त अधिकारी अविनाश जाधव यांच्यासह काही अधिका-यांची बदली केल्याने महापौरांनी दिलेला इशारा मागे घेत सोमवारपासून आपल्या दालनात त्या उपस्थित राहिल्या. मात्र पुढेही आयुक्तांचा सुधारीत कारभार सहकार्याचाच रहावा, यासाठी त्यांना ८ दिवसांचे अल्टिमेटमही दिल्याचे महापौरांनी सांगितले.
विरोधी पक्ष नेत्याच्या घोषणेवरुन सेनेचा इशारा हवेतच
गेल्या १६ आॅक्टोबरपासुन महापौरांच्या घोषणेअभावी लटकलेल्या विरोधी पक्ष नेता पदावरील नियुक्तीवरुन शिवसेनेने सोमवारपर्यंत महापौरांना नियुक्तीचे अल्टिमेटम दिले होते. त्यात महापौरांनी सेनेचे राजू भोईर यांच्या नावाची घोषणा त्या पदासाठी सोमवारपर्यंत न केल्यास सेनेचे नगरसेवक व पदाधिकारी परस्पर विरोधी पक्ष नेत्याच्या दालनाचा ताबा घेऊन कारभार सुरु करतील, असा इशारा देण्यात आला. परंतु, सेनेला आपल्या इशा-याचा विसर पडल्याने त्यांचा इशारा हवेतच विरळ झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.याबाबत महापौर डिंपल मेहता यांनी सांगितले कि, त्या पदाच्या नियुक्तीबाबत पालिका अधिनियमातील तरतुदीनुसार राज्य सरकारकडुन अभिप्राय मागविण्यात आला आहे. तो अद्याप आपल्या प्राप्त न झाल्याने नियुक्तीचा प्रश्नच येत नाही. तसेच शिवसेना गटनेते हरिश्चंद्र आमगावर यांनी सांगितले कि, सोमवारपासुन महापौर दालनात उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळाल्याने आम्ही त्या दालनाचा ताबा घेण्यास पालिका मुख्यालयात आलो नाही. परंतु, मंगळवारी त्या दालनाचा ताबा घेऊन महापौरांच्या दालनात भोईर यांच्या नावाची घोषणा होईपर्यंत ठाण मांडणार आहोत.