डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीत बहुतांश ठिकाणचे रस्ते खड्ड्यांनी व्यापले आहेत. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रिक्षाचालक पुरते बेजार झाले असून खड्ड्यांमुळे चाळण झालेल्या रस्त्यावरून वाहन नेण्यास नकार देणारा फलक जुनी डोंबिवली परिसरात पाहायला मिळत आहे. रिक्षास्टॅण्ड ते गिरिजामाता मंदिरपर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याने प्रवाशांनी स्टॅण्डवर उतरून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जुनी डोंबिवली रिक्षास्टॅण्डच्या चौकात हा फलक लावलेला आहे.यंदा पावसाचे आगमन उशिरा झाले असले, तरीही केडीएमसी आणि यंत्रणांना रस्तेदुरुस्तीची कामे वेळेत मार्गी लावता आलेली नाहीत. अनेक रस्त्यांवर टाकलेले डांबर मुसळधार पावसात वाहून गेल्याने कल्याण-डोंबिवलीत बहुतांश ठिकाणी रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. केडीएमसी प्रशासन खडी टाकून हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करत आहे. पण, वाहनांच्या येजा करण्याने खडी पुन्हा खड्ड्यांतून बाहेर पडत आहे. त्यामुळे खडीकरणाची मात्रा निरुपयोगी ठरत आहे. काही दिवसांपूर्वी जुनी डोंबिवली रिक्षास्टॅण्ड चौक ते गिरिजामाता मंदिर रोडदरम्यान निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे एका रिक्षाला अपघात झाल्याची घटना घडली होती. यामुळे येथील रिक्षाचालकांनी धास्ती घेतली असून गिरिजामाता मंदिर परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना आवाहन करणारा एक फलकच रिक्षास्टॅण्डवरील पदाधिकाऱ्यांनी चौकात लावला आहे. त्यावर खड्ड्यांसंदर्भात तक्रार करण्यासाठी केडीएमसीच्या ‘ह’ प्रभागातील एका अधिकाºयाचा मोबाइल नंबरही फलकावर दिला आहे. या फलकाने तरी प्रशासनाला जाग येते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
खड्डेमय रस्त्यांवर रिक्षा नेण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 1:02 AM