ठाणे : बहीणभावाच्या प्रेमळ नात्याची साक्ष देणारा रक्षाबंधन सण यावर्षीही साजरा झाला, मात्र आॅनलाइन. कोरोनाची भीती आणि वाहतुकीच्या अपुऱ्या साधनांमुळे बहिणींना भावाकडे जाता न आल्याने त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत ग्रुप व्हिडीओ कॉल, मीटच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. प्रत्यक्ष सण साजरा करता आला नसला, तरी उत्साह मात्र कायम होता.
कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम यंदा सर्वच सणउत्सवांवर झालेला पाहायला मिळाला. कोणतेही सण प्रत्यक्ष साजरे झालेच नाहीत. रक्षाबंधनाचा सण म्हटले की, बहिणी भावांच्या घरी जाऊन राखी बांधतात. मिष्टान्नाचे बेत रंगतात. मात्र, यंदा कोरोनामुळे अनेक बहिणींना भावाच्या घरी रक्षाबंधनासाठी जाताच आले नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सोय नसल्याने लांब पल्ल्यावर असलेली आपापल्या भावांची घरे गाठण्याचा बेत बहिणींनी रद्द केला. परंतु, ठिकठिकाणी असलेले भाऊबहीण ग्रुप कॉल, व्हिडीओ कॉल, चॅटच्या माध्यमातून एकत्र जमले होते. अनेकांनी व्हिडीओ कॉलिंगद्वारे आपल्या भावंडांना शुभेच्छा देत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तर, आपल्यापासून जवळच्याच अंतरावर राहणाºया बहीणभावांनी मात्र एकमेकांच्या घरी थोड्या वेळासाठी जाऊन का असेना रक्षाबंधनाचा सण साजरा केला.राखीविक्रेते, मिठाई व्यापाऱ्यांवर या परिस्थितीचा परिणाम झालेला पाहायला मिळाला. दरवर्षी शेवटच्या दिवसापर्यंत राख्यांची मोठी विक्री होते. मिठाईच्या दुकानात मिठाई, नमकीनचे पदार्थ खरेदीसाठी प्रचंड गर्दी असते. मात्र, यंदा प्रत्यक्ष घरी जाऊन रक्षाबंधन मोठ्या प्रमाणात साजरा न झाल्याने राख्यांची फारशी विक्री झाली नाही. दरवर्षी मिठायांना मोठी मागणी असते. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा एकूणच मिठाईला कमी मागणी होती, असे मिठाई व्यापाºयांनी सांगितले.लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : बहीणभावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. बहीण आपल्या भावाला राखी बांधून संकटाच्या काळात मदतीला धावून ये असे सांगते, अशी आपल्याकडील परंपरा आहे. मात्र, भाऊ बहिणीला राखी बांधतो, हे थोडे वेगळे वाटेल, पण वास्तव फाउंडेशन हा उपक्रम चार वर्षे राबवत आहे. स्त्रीपुरुष समानता यातून दाखवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे फाउंडेशनचे प्रमुख अमित देशपांडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.पुरुषांच्या हक्कासाठी हे फाउंडेशन काम करत आहे. आपल्या समाजात पुरुष हा घरातील कर्ता असल्याने त्याने नेहमीच खंबीर, धीराने वागले पाहिजे, असे संस्कार केले जातात. पण, एखाद्यावेळी तोच पुरुष अस्वस्थ असेल, तर तो कुणाकडे मन मोकळे करणार. अशा कठीण परिस्थितीत जर त्या पुरुषाने आपल्या बहिणीकडे मदत मागितली, तर काय झाले? पण तो अशी मदत मागायला संकोच करतो, असे देशपांडे यांनी सांगितले. बहीण काय म्हणेल, त्यापेक्षा समाज काय म्हणेल, याची चिंता त्याला अधिक सतावत असते. जर आपला भाऊ नैराश्याच्या गर्तेत अडकला असेल, तर त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी बहिणीने त्याच्याशी बोलले पाहिजे. बहिणीच्या संकटाच्यावेळी भाऊ मदतीला धावून जातो तसेच बहिणीनेही गेले पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.देहव्यापार करणाºया महिलांचे रक्षाबंधनभिवंडी : शहरातील देहव्यापार करणाºया महिलांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाºया हनुमान टेकडी येथे श्री साई सेवा संस्थेच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या कार्यकर्त्यांना येथील महिलांनी राख्या बांधल्या. याप्रसंगी डॉ. शाहिद खान, डॉ. स्वाती खान यासह परिसरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.