अंबरनाथ : रेमडेसिविर हे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील एकही रुग्णालय प्रशासन ते उपलब्ध करून देण्यासाठी जबाबदारी घेत नाहीत. सरसकट रुग्णांच्या नातेवाइकांना हे इंजेक्शन उपलब्ध करण्यास भाग पाडले जात आहे, तर पालिका प्रशासनही या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप करताना दिसत नाही.
रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा रुग्णांच्या नातेवाइकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रुग्णाची प्रकृती खालावल्याने थेट प्रत्येक डॉक्टर या इंजेक्शनची मागणी करीत आहेत. मात्र अंबरनाथ आणि बदलापुरात आज हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी कोणतीही एजन्सी नाही. अशा कठीण परिस्थितीत अंबरनाथ आणि बदलापुरातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांना उल्हासनगर आणि कल्याण या भागात इंजेक्शनसाठी जावे लागते. मात्र त्याठिकाणीही ८०० ते ९०० लोकांची वेटिंग लिस्ट लागल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालयातच इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे, असे सरकारचे आदेश लागू करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी शहर पातळीवर सुरू झालेली नाही. शहरातील रुग्णालय अद्यापही रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध करून देत नाही. त्यामुळे इंजेक्शन उपलब्ध करून घेण्याची जबाबदारीही त्यांच्या कुटुंबीयांवर आली आहे. आजही अनेक रुग्णांचे नातेवाईक इंजेक्शन उपलब्ध करून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. मात्र इंजेक्शनचा तुटवडा असल्याने ते वेळेवर उपलब्ध होत नसून रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
रुग्णाला इंजेक्शनची गरज आहे एवढेच सांगून डॉक्टर आपली जबाबदारी झटकत आहे. कुटुंबीयांची मोठ्या प्रमाणात धावपळ होत आहे. त्यांना कोठेही इंजेक्शन उपलब्ध होत नाही.
- संदीप लकडे, अंबरनाथ