ठाणे : शहरात वारंवार वृक्ष पडण्याच्या घटना घडत असतात. त्यांत काहीजण जखमी होतात, तर काहींना आपले प्राणही गमवावे लागत आहेत. त्यामुळे वृक्ष पडून तसेच गटारांच्या चेंबरमध्ये पडून मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींच्या नातेवाइकांकडून महापालिकेकडे मदतीची मागणी होत होती. परंतु, अशा परिस्थितील कशा स्वरूपाची मदत द्यायची, असा पेच प्रशासनाला सतावत होता. त्यामुळे आता ही मदत कोणत्या स्वरूपाची असावी, याचा निर्णय प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या हाती सोपविला असून तसा प्रस्ताव सोमवारी होणाऱ्या महासभेसमोर ठेवला आहे.
वृक्ष दुर्घटनेत २०१७ मध्ये धर्मवीरनगर येथे किशोर पवार यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नीला पालिका सेवेत नोकरी देण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केली होती. त्यासंबंधीचा प्रस्ताव शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविला होता. परंतु, शासनाने तो फेटाळून लावला होता. अखेर प्रशासनाने पवार यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती. २०१६ मध्ये साकेत रस्त्यावरील गटाराचे चेंबर तुटून खाली पडले होते. त्यात जमिला अलिस खान यांचा मृत्यू झाला होता. याच वर्षी महापालिकेच्या कला, क्रीडा महोत्सवात सहभागी झालेल्या एका खेळाडूचा अपघाती मृत्यू झाला होता. या दोघांनाही प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत महापालिकेने देऊ केली होती.
दरम्यान, २१ एप्रिल २०२१ रोजी मासुंदा तलाव परिसरात झाड पडून रिक्षाचालक अरविंद राजभर आणि चंद्रकांत पाटील यांचा मृत्यू झाला होता. या दोघांच्या नातेवाइकांनी नुकसानभरपाई म्हणून आर्थिक मदत देण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे. परंतु, आर्थिक मदत देण्याची कोणतीही तरतूद नसल्यामुळे प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. यामुळेच आता या संदर्भातील निर्णय घेता यावा यासाठी प्रस्ताव तयार करून तो सोमवारच्या महासभेत मंजुरीसाठी ठेवला आहे.