राज्य सरकारच्या शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी उच्च न्यायालयाने ‘डेडलाईन’ दिली होती. ती संपली तरी त्यावर ठोस कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. मात्र काही शाळांनी हा ‘दप्तरभार’ कमी करण्यासाठी खास पुढाकार घेतला. विविध उपाय शोधून काढले आणि दप्तरांचे ओझे हलके करण्यासाठीची गुरूकिल्ली दिली. त्या गुरूकिल्लीचा वापर करून इतर शाळांनीही मुलांच्या पुस्तकांसाठी कपाटे ठेवण्याची गरज आहे. केवळ सरकारवर अवलंबून न राहता स्वयंप्रेरणेतून योजलेल्या उपायांची दखल इतर शैक्षणिक संस्थांनी घेतली तरी विद्यार्थ्यांवरचा दप्तरांच्या ओझ्याचा ताण जरासा कमी होणार आहे.डोंबिवलीतील टिळकनगर शाळेने मुलांनी रोज दप्तर गच्च भरून आणू नये, यासाठीची उपाययोजना केली आहे. या शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विजया निरभवणे यांनी सांगितले की, आमच्या शाळेत आम्ही जोड तासिका केल्या आहेत. त्यामुळे दप्तराचे ओझे कमी झाले आहे. दिवसाला दोन ते तीन विषय ठेवले आहे. शिवाय मोठी दप्तरे आणायची नाहीत. शाळेत ई लर्निंगची सुविधा आहे. विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तके आणायला सांगतो. शंभर पानी वह्या आणयला सांगतो. या प्रयत्नांतून आम्ही दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत.कल्याणमधील सम्राट विद्यालयाचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, भाषा विषयाला शंभरपानी वह्या केल्या आहेत. त्याच वहीत दोन भाग करून एक भाग मराठीसाठी तर दुसरा इंग्रजीसाठी ठेवला आहे. इतिहास, भूगोल या विषयासाठी एकच वही ठेवली आहे. पीटीच्या विषयाला साहित्य आणावे लागत नाही. चित्रकलेसाठी आठवड्यातून चार तासिका असतात. त्या दोन दिवसांमध्ये विभागून ठेवल्या आहेत. त्यामुळे दप्तराचे ओझे कमी झाले आहे. कल्याण येथील सुभेदारवाडा शाळेच्या प्रज्ञा मोने यांच्या मते, कार्यानुभव, हस्तकला, चित्रकला यासारख्या विषयांची पुस्तके आम्ही शाळेच्या कपाटात ठेवतो. मुलांना सर्व विषयांसाठी दोन वह्या करायला सांगितल्या आहेत. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पालकसभा घेऊन पालकांनाही सूचना दिल्या आहेत. काही पालक विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकाकडे लक्ष देत नाही. त्यामुळे त्यांच्या पाठीवरील दप्तरात सगळ््याच पुस्तकांसह वह्याचा भरणा असतो. पहिली व दुसरीसाठी केवळ तीनच विषय आहेत. शासनाच्या जीआरनुसार तीन पुस्तके आणण्यास परवानगी आहे. त्यामुळे पहिली व दुसरीचे विद्यार्थी तीन पुस्तके आणि दोन वह्या आणतात. तर तिसरी आणि चौथीतील विद्यार्थ्यांना विषय जास्त असल्यामुळे एका बेंचवरील विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार एकाला एका विषयाचे व दुसऱ्याला दुसऱ्या विषयांची पुस्तके आणयला सांगतो.
हलके झाले दप्तरांचे ओझे!
By admin | Published: December 21, 2015 1:20 AM