बदलापूर : बदलापुरात बोअरवेलच्या खड्ड्यात कुत्र्याची दोन पिल्ली पडल्याची घटना घडली. या दोन्ही पिल्लांना पाणवठा संस्थेच्या स्वयंसेवकांनी १३ तासांच्या प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढले.
बदलापूरमध्ये कल्प सिटी नावाची सोसायटी असून, या सोसायटीच्या आवारात एक बोअरवेलसाठी खड्डा खोदण्यात आला होती. मात्र, ही बोअरवेल उघडीच असल्याने दोन कुत्र्यांची पिल्ली खेळता खेळता तिथे गेली आणि या खोल खड्ड्यात पडली. खड्ड्यातून पिलांचा आवाज आल्यानंतर ही घटना समोर आली आणि एकच खळबळ उडाली. यानंतर पाणवठा या अपंग प्राण्यांसाठी अनाथाश्रम चालविणाऱ्या संस्थेच्या स्वयंसेवकांना सोसायटीतील रहिवाशांनी बोलाविले. गणराज जैन त्यांच्या पुढाकाराने संस्थेच्या स्वयंसेवकांनी आधी या बोअरवेलमध्ये कॅमेरा सोडून पिलांची परिस्थिती पाहिली. त्यानंतर गळ टाकून सोमवारी सकाळी सहापासून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असताना दुपारी १२ वाजता पहिल्या पिलाला, तर सायंकाळी सहा वाजता दुसऱ्या पिलाला सुखरूप बाहेर काढण्यात संस्थेच्या स्वयंसेवकांना यश आले.