लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील सर्वसामान्यांची रक्तवाहिनी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे म्हणजे ‘लोकल’ने प्रवास करण्यास सध्या बंदी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चाकरमान्यांचे जगणे जर्जर झाले आहे. पण, आता लवकरच कोरोना प्रतिबंधक दुसरा डोस घेणाऱ्यांचा लोकल प्रवास सुकर होऊन निर्बंधातून मुक्ती होणार असल्याचे राज्य शासनाचे संकेत आहेत. यामुळे रेल्वे प्रवासासह निर्बंध शिथिल होण्यासाठी जिल्ह्यातील दुसरा डोस घेणाऱ्या सहा लाख लाभार्थ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
दुसरा डोस घेणाऱ्यांना रेल्वे प्रवास करू देण्याच्या मुद्द्यावर राज्य शासन सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी पुण्यात सांगितले. तर या दुसऱ्या डोसच्या लाभार्थ्यांना लवकरच निर्बंधातून सूट देण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दुसऱ्या डोसचे लाभार्थी ठरलेल्या या पाच लाख ९७ हजार २५१ नागरिकांच्या कोरोनामुक्तीसह निर्बंधातून सुटका आणि उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्यासाठी मुभा मिळण्याचे संकेत असल्याने जिल्ह्यात या चाकरमान्यांच्या आशा, आकांशा वाढल्या आहेत.
दुसऱ्या डोसचे लसीकरण होऊन १५ दिवस उलटलेल्यांना उपनगरीय प्रवासी (लोकल) सेवेचा लाभ द्या, त्यांना लोकलने प्रवास करू देण्यास मुभा द्यावी, या मागण्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयात काही जाणकारांनी धाव घेतली आहे. त्यामुळे कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून या दुसऱ्या डोसच्या लाभार्थ्यांमध्ये उपनगरीय रेल्वे प्रवासाच्या लाभाची आशा व्यक्त केली जात आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील पाच लाख ९७ हजार २५१ जणांना या संधीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तर पहिल्या डोसचे १६ लाख ८० हजार ७८४ लाभार्थ्यांचे पाय दुसऱ्या डोसच्या लसीकरणासाठी केंद्रांकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.
-------
* जिल्ह्यातील दुसरा डोस घेतलेले शहरनिहाय लाभार्थी खालील प्रमाणे
शहराचे नाव - दुसरा डोस लाभार्थी
१) ठाणे - १,४७,२३९
२) नवी मुंबई - १,३६,२११
३) कल्याण डोंबिवली - ९७,०९९
४) भिवंडी - २०,४४३
५) मीरा-भाईंदर - ८९,६७५
६) उल्हासनगर - १७,१०७
७) ठाणे ग्रामीण - ८९,४७७