ठाणे : कारागृहांच्या सुरक्षेकरिता सभोवताली बांधकामांवर घातलेले निर्बंध शिथिल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय गृह विभागाने घेतला आहे. मुंबई वगळून अन्य जिल्ह्यातील मध्यवर्ती कारागृहांच्या आजूबाजूला बांधकामांवरील निर्बंधांची मर्यादा ५०० मीटर वरून १५० मीटर इतकी कमी केली आहे. अगोदर १५० मीटरपर्यंत असलेला बफर झोन आता २० मीटर इतका कमी केला आहे. त्यामुळे ठाणे शहरातील राबोडी, पोलीस वसाहत, के व्हीला, उथळसर या भागातील पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाल्याने हजारो ठाणेकरांना दिलासा लाभला आहे.कारागृहाजवळच्या उंच इमारतींमुळे कैद्यांच्या जीवाला धोका असल्याने सरकारने कारागृहांच्या सभोवताली ५०० मीटर अंतरावरील बांधकामावर निर्बंध घातले होते. नव्या आदेशानुसार, १५० मीटरच्या बफरझोनचे निर्बंध उठवले असून ते २० मीटरपर्यंत कमी केले आहेत. तर २० ते १५० मीटर अंतरापर्यंतच्या बांधकामांची परवानगी समितीमार्फत दिली जाईल. ती परवानगी देताना कारागृहातील कैद्यांची सुरक्षा विचारात घेतली जाईल....अखेर न्याय मिळालाराज्यातल्या सर्व कारागृहाभोवती बांधकामे झाली आहेत. परंतु, शासन आदेशामध्ये केवळ सरकारी जागांचा उल्लेख होता. खासगी जागेवर बांधकामे झाली. सरकारने सोयीचा अर्थ लावल्याने काही बांधकामांची कोंडी झाली होती. मॉडेल नॅशनल जेल मॅन्युअलमध्ये विकासाचे निर्बंध १५० मीटर अंतरापर्यंतच असताना महाराष्ट्रात ते ५०० मीटरपर्यंत आहेत. त्यामुळे हे निर्बंध शिथिल करावे, ही मागणी अखेर मान्य झाली आहे.- नजीब मुल्ला, नगरसेवक
ठाणे कारागृहाजवळच्या बांधकामांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 2:56 AM