भिवंडी : तालुक्यातील वळपाडा येथे इमारत कोसळल्याची घटना मागील महिन्यात घडली होती.या दुर्घटनेतील ८ मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी २ लाख, तर १० जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती सोमवारी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
वळपाडा परिसरात २९ एप्रिल रोजी इमारत कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला होता. तर बचाव पथकाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १० जखमी नागरिकांची सुटका करण्यात आली. मृतांचे नातेवाईक व जखमींना राज्य सरकारकडून मदत देण्यात आली होती. या दुर्घटनेतील आपघातग्रस्तांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मदत द्यावी, अशी विनंती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली होती. त्यानुसार पंतप्रधान कार्यालयाने मदत जाहीर केली आहे. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात मृतांचे नातेवाईक व जखमींच्या बॅंकेतील खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती मंत्री पाटलांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, भिवंडी तालुक्यात पंधरा ते वीस वर्षांपूर्वी उभारलेल्या अनेक इमारती जीर्ण झाल्या आहेत. भविष्यात जीवितहानी टाळण्यासाठी जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी सूचना केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी वळपाडा इमारतीच्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारला केली होती.