डोंबिवली : केडीएमसीचे एमआयडीसीतील डोंबिवली अग्निशमन केंद्र धोकादायक झाल्याने ते पलावा जंक्शन येथे हलविण्यात येणार आहे. परंतु, गरजेनुसार एमआयडीसीच्या परिसर अथवा नजीकच्या भागातील एखाद्या जागेत ते हलविणे अपेक्षित होते. डोंबिवलीपासून ते पाच ते सहा किमी अंतरावर असलेल्या ठिकाणी नेले जात आहे. त्यात कल्याण-शीळ मार्गावरील वाहनांची कोंडी पाहता आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी पोहोचताना यंत्रणेला विलंब लागणार आहे.
एमआयडीसीतील हे अग्निशमन केंद्र केडीएमसीच्या स्थापनेपासूनच १९८३ला सुरू झाले. प्रारंभी एमआयडीसीची गरज म्हणून उभारलेल्या या केंद्रातून कालांतराने संपूर्ण शहरात सेवा दिली जात आहे. या केंद्राचे बांधकाम साधारण १९७९-८० मधील आहे. २००८-०९ मध्ये केंद्राची डागडुजी करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर मात्र देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने बहुतांश ठिकाणी भिंतीतून पावसाचे पाणी झिरपत असल्याने प्लास्टर कोसळण्याच्या स्थितीत आहे. अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील छताचे प्लास्टर ऑगस्ट २०१९ मध्ये कोसळले होते. आजही केंद्राची अवस्था पाहता जीव मुठीत धरूनच येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांना वावरावे लागत होते.
दरम्यान, केंद्र धोकादायक असल्याचे आणि ते वापरण्यालायक राहिले नसल्याचे स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये उघडकीस आल्याने तेथील कारभार येत्या दोन ते तीन दिवसात पलावा येथे हलविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रप्रमुख दत्तात्रय शेळके यांनी दिली.
-------
केंद्र दूर नेण्याची नामुष्की
- महापालिकेने आपले अनेक भूखंड महसूल विभागाला उपलब्ध करून दिले आहेत. सुसज्ज अशा या जागा आहेत. पोलीस ठाण्यांसाठीही जागा दिल्या आहेत. परंतु, अग्निशमन केंद्रासाठी मात्र डोंबिवलीत जागा न मिळाल्याने दूरवर असलेल्या आणि वाहतूककोंडीचे जंक्शन असलेल्या पलावा येथे हलविण्याची नामुष्की मनपावर आली आहे.
- एमआयडीसीत मोठ्या प्रमाणावर रासायनिक कंपन्या आहेत. दरवर्षी सात ते आठ कंपन्यांना मोठ्या आगी लागतात, तर इतरही आगींचे ३०० ते ३५० कॉल या केंद्रात येतात. त्यामुळे पलावा येथे केंद्र गेल्यावर आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी घटनास्थळी पोहोचताना अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
-----------------