ठाणे : जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील ९५४ गावांमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण होत आली आहे. जिल्ह्यात ६९ हजार २६६ पात्र शेतकरी कुटुंबे असून त्यापैकी ६६ हजार ५३७ शेतकऱ्यांची माहिती एनआयसीच्या पोर्टलवर अपलोड झाली आहे. या कामामुळे जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. ज्यांनी अद्याप माहिती व कागदपत्रे दिली नसतील, अशांनी ती त्वरित उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत कल्याण तालुक्यातील पात्र कुटुंबांची संख्या ७५५६ आहे. अंबरनाथ तालुक्यात ही संख्या ४७३७, तर भिवंडी तालुक्यात पात्र कुटुंबांची संख्या १६१४१ इतकी आहे. शहापूर तालुक्यात पात्र कुटुंबांची संख्या १८ हजार ५८७ इतकी आहे. मुरबाड तालुक्यात पात्र कुटुंबांची संख्या १९५१६ असून ती सर्वाधिक आहे. ठाणे तालुक्यातील पात्र कुटुंबांची संख्या २७२९ आहे. याव्यतिरिक्त अद्यापही कागदपत्रे जमा न केलेल्या आणि ज्यांची जमीन पाच एकरपेक्षा कमी असेल, अशा शेतकरी कुटुंबांनी तसेच जी कुटुंबे स्थलांतरित झाली असतील किंवा ज्या शेतकºयांचा मृत्यू झाला असेल, त्यांच्या कुटुंबीयांनी कागदपत्रे, आधारकार्ड, बँकेचे पासबुक आणि बँकेचा आयएफएस कोड यांच्यासह तातडीने गावचे तलाठी, कृषी सहायक अथवा ग्रामसेवक यांच्याकडे सादर करावीत, असे आवाहन केले आहे.