मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेकडे असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा संपला आहे. त्यामुळे सदर इंजेक्शनची आवश्यकता असलेल्या पालिका कोविड उपचार केंद्रात दाखल तसेच शहरातील अन्य रुग्णांच्या नातलगांची सदर इंजेक्शनसाठी वणवण सुरु आहे. कोरोना संसर्ग झपाट्याने वाढल्याने कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट झाला आहे. जेणे करून कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी सुद्धा प्रचंड वाढली आहे . एका रुग्णास किमान ६ इंजेक्शन द्यावी लागतात. परंतु सदर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांच्या नातलगांची वणवण सुरु असून मागेल त्या दराने इंजेक्शन आणावे लागत आहे . अनेक ठिकाणी संपर्क करून व प्रत्यक्ष धावपळ करून सुद्धा इंजेक्शन मिळणे अवघड झाले आहे. समाज माध्यमांमध्ये सुद्धा इंजेक्शन मिळण्यासाठी आवाहन केले जात आहे. त्यातच मीरा भाईंदर महापालिके कडे रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा संपला आहे . चालू महिन्यात पालिकेला केवळ ४०० इंजेक्शनच मिळाली आहेत . तर शासना कडून ५०० इंजेक्शन आली आहेत . महापालिकेने पुरवठादार कंपन्यांकडे ६ हजार इंजेक्शनची मागणी केली होती. परंतु इंजेक्शनचा पुरवठा अजूनही पालिकेला झालेला नाही. खाजगी रुग्णालयांकडे इंजेक्शन असल्याचे वितरक सांगत असले तरी रुग्णालयाने त्यांच्याकडे दाखल रुग्णांसाठी इंजेक्शन ठेवली असल्याचे सांगितले जाते . त्यातच कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढल्याने इंजेक्शनची मागणी वाढली आहे . इंजेक्शनचा साठा लवकर झाला नाही तर उपचारात मोठी अडचण होऊन रुग्णांचे मृत्यू होण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जात आहे .
Remdesivir Injection : मीरा भाईंदर महापालिकेकडील रेमडेसिविरचा साठा संपला; रुग्णांच्या नातलगांची वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 7:43 AM