ठाणे : एकीकडे ठाण्यात रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत असतांना दुसरीकडे ठाणे महापालिकेच्याच कोविड सेंटरमधून काही दिवसांपूर्वी त्याचा काळा बाजार करणाऱ्यास अटक केली आहे. याचा तपास ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने सुरू केला तरी महापालिकेच्या आरोग्य विभागाने मात्र याची साधी चौकशीदेखील अद्याप केली नसल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी झालेल्या महासभेत उघड झाली. त्यामुळे या संदर्भात महापौर नरेश म्हस्के यांनी आरोग्य अधिका:यांना चांगलेच सुनावून या प्रकरणाचा तपास हा आरोग्य विभागाने केलाच पाहिजे असे स्पष्ट केले.
ठाणे महापालिका हद्दीत सध्या रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत आहे. ते इंजेक्शन मिळावे यासाठी महापालिका जास्तीची किमंत मोजण्यासही तयार झाली आहे. परंतु, महापालिकेच्याच कोविड सेंटरमधून त्याचा काळा बाजार केला जात असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी उघड झाली होती. ठाणे खंडणी विरोधी पथकाने रेमडेसिविरचा काळा बाजार करणा:या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. . यातील एक आरोपी हा महापालिकेच्याच ग्लोबल कोविड सेंटरमध्ये कामाला होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आरोग्य विभागाकडून होणे अपेक्षित होते, अशी माहिती म्हस्के यांनी महासभेत दिली. त्याला रेमडेसिविर कोण देत होते, कोणाकडून त्याने ते उचलले होते, याची माहिती आरोग्य विभागाने घेणे गरजेचे होते. परंतु, त्यांनी या प्रकरणाकडे काहीच लक्षच दिले नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाची चौकशी आरोग्य विभागाने केली का? असा सवालही त्यांनी केला. परंतु, खंडणी विरोधी पथक या प्रकरणाची चौकशी करीत असल्याने आम्ही त्याची चौकशी केली नसल्याची माहिती प्रभारी आरोग्य अधिकारी वैजयंती देवगीकर यांनी सभागृहात दिली. त्यांच्या या उत्तराने महापौर आणखीनच संतप्त झाले. महापालिकेच्या कोविड सेंटरमधून जर इंजेक्शन गायब होत असतील त्याची जबाबदारी ही आरोग्य विभागाची नाही का?, त्याचा तपास हा झालाच पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. एकूणच या प्रकरणात आरोग्य विभागाची चुक असल्याचेही त्यांनी सांगितले.