कल्याण : केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अचानक केलेल्या पाहणी दौऱ्यानंतर सध्या कल्याण आणि डोंबिवलीतील रेल्वेस्थानक परिसराला लागून असलेल्या स्कायवॉकने मोकळा श्वास घेतला आहे. मात्र, आयुक्तांच्या दणक्यानंतर फेरीवाल्यांविरोधात जोमाने कारवाई सुरू झाल्याने फेरीवाला संघटनांना पुनर्वसनाच्या मुद्याचीही आता आठवण झाली आहे. फेरीवाल्यांच्या काही संघटना सोमवारी सूर्यवंशी यांची भेट घेऊन फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी साकडे घालणार आहेत.
रेल्वेस्थानकापासून १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मनाई असतानाही या परिक्षेत्रातील कल्याण-डोंबिवली शहरांतील स्कायवॉक मात्र फेरीवाल्यांना आंदण दिल्याचे चित्र सातत्याने पाहायला मिळायचे. दिवाळीत डोंबिवलीत फेरीवाल्यांचे राडाबाजी प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यावेळी आमदार रवींद्र चव्हाण यांनी तत्कालीन आयुक्त गोविंद बोडके यांना खरमरीत पत्र पाठवून ‘जमत नसेल तर बदली करून घ्या’ असा सल्ला दिला होता. यानंतर काही दिवस केडीएमसीने धडक कारवाई केली होती. परंतु, पुढे ती थंडावल्याने अतिक्रमणाची स्थिती जैसे थे राहिली. मात्र, फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासंदर्भात डोंबिवलीतील ‘ग’ आणि ‘फ’ प्रभागांतील जागांची सोडतही काढण्यात आली होती. मात्र, पुढील कार्यवाही ठोस अंमलबजावणीअभावी कागदावरच राहिली आहे.डोंबिवलीच्या जागा सोडतीनंतर कल्याणसाठी सोडत प्रक्रिया होणार होती. परंतु, तिला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. यात फेरीवाल्यांचे मनाई केलेल्या परिसरातही व्यवसाय जोमात सुरू असल्याने फेरीवाला संघटनांनाही पुनर्वसनाचा विसर पडला होता. पण, सूर्यवंशी यांनी फेरीवाला अतिक्रमण हटविण्यात हयगय केल्याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांसह एका कर्मचाºयाचे केलेले निलंबन पाहता फेरीवाला अतिक्रमणविरोधी पथके गुरुवारपासून अधिकच सक्रिय झाली असून, कारवाई जोमात सुरू आहे. या कारवाईमुळे रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिल्याने आपसूकच आता फेरीवाला संघटनांना पुनर्वसनाची आठवण झाली आहे.आधी अंमलबजावणी कराच्माजी आयुक्त बोडके यांनी फेरीवाल्यांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु, नवीन आयुक्तांनी फेरीवाला संघटनांना विश्वासात न घेता कारवाई सुरू केली आहे. पहिली फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करा, मगच कारवाई करा, अशी आमची मागणी आहे.च्आयुक्तांची सोमवारी भेट घेणार असून त्यांना निवेदन दिले जाईल. फेरीवाला संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद मोरे आणि डोंबिवलीतील फेरीवाला संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांनाही उपस्थित राहण्यासंदर्भात विनंती करणार आहोत, अशी माहिती भाजीपाला-फळे- फेरीवाला कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत माळी यांनी दिली.