उल्हासनगर : खेमानी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते आईस फॅक्टरीदरम्यानच्या रस्त्याची पाणी गळतीने दुरवस्था झाली असून, महापालिकेने वेळीच दुरुस्ती न केल्यास मोठ्या अपघाताची शक्यता मनसेचे प्रवीण माळवे यांनी व्यक्त केली.
शहरातील खेमानी परिसरातील प्रभाग क्र-७ मधील आंबेडकर चौक ते आईस फॅक्टरीदरम्यानच्या रस्त्यावर जागोजागी जलवाहिनीला गळती लागली. पाणी वाहत असल्याने रस्त्याला खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली. महापालिकेने अपघाताची वाट न पाहता रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी माळवे यांनी महापालिकेकडे वारंवार निवेदनाद्वारे केली. मात्र महापालिका याकडे दुर्लक्ष करीत असून, अपघात झाल्यास याला महापालिका प्रशासन जबाबदार राहणार असल्याचा आरोप माळवे यांनी केला. दुरुस्तीचे काम लवकर सुरू न केल्यास, मनसेच्या माध्यमातून जनआंदोलन करण्याचा इशारा यावेळी माळवे यांनी दिला. खेमानी परिसरातील डॉ. आंबेडकर चौक रस्ता तीव्र उताराचा असून, जवळील जलसाठ्यातून उच्च दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने जलवाहिनेला गळती लागून रस्त्याची दुरवस्था झाली. गेल्याच महिन्यात महापालिकेने पाणी गळती बंद करण्याची मोहीम राबविली होती. तसेच रस्त्याची पुनर्बांधणी होणार असल्याची माहिती उपमहापौर भगवान भालेराव यांनी दिली.