ठाणे : समृद्धी महामार्गामधील ठाणे जिल्ह्यात येणारा वनविभागाच्या मान्यतेचा मुख्य अडसर आता दूर झाला आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमीन हस्तांतरणाचे काम पूर्ण होत आले असतानाच वनविभागाने ठाणे जिल्ह्यात जाणाऱ्या वनजमिनीसाठी औरंगाबाद जिल्ह्यात दिलेल्या ३८५ हेक्टर पर्यायी जागेच्या बदल्यात या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीच्या आधी या प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्ह्यात देण्यात आलेल्या पर्यायी जागेवर वृक्षलागवड करण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने ८० कोटी ४१ लाख २५ हजार ७५७ रुपये संबंधित वनसंरक्षकांकडे सुपूर्द केले आहे. येत्या जुलै महिन्यात याठिकाणी वृक्षलागवड सुरू होणार असल्याचे कळते. समृद्धी महामार्ग प्रकल्पानंतर मुंबई-नागपूर हे अंतर सात तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जमीन देण्यास सुुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांचा मोठा विरोध होता. त्यानिमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणी स्थानिकांची आंदोलनेसुद्धा झाली. मात्र, बाजारभावाने जमिनीचा मोबदला शेतकºयांच्या थेट बँक खात्यावर जमा केला जाऊ लागल्याने हळूहळू या प्रकल्पाला असलेला विरोध मावळला.
बहुतेक बाधित शेतकºयांनी आपल्या जमिनी प्रकल्पासाठी दिल्या. आता जमीन हस्तांतरण प्रक्रि या पूर्ण होत असतानाच वनविभागानेही या प्रकल्पाला परवानगी दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील ३८५ हेक्टर वनजमीन यात येत आहे. त्याबदल्यात औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अंधारी आणि फुलंब्री तालुक्यांतील जातवा आणि उमरावती या गावांमधील जागा वनलागवडीसाठी दिली आहे. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांच्या अखत्यारीत असलेली ही महसुली जमीन वनविभागाला सुपूर्द केली आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्येमुंबई-नागपूर हे अंतर ८१२ किलोमीटर असून ते पार करण्यासाठी सध्या १४ तास लागतात. समृद्धी महामार्गाने ते अंतर ७०० किमी होऊन ते आठ तासांत कापता येणार आहे. औरंगाबाद येथून मुंबई, नागपूरला जाण्यासाठी चार तास लागणार आहे. आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार हा रस्ता बांधण्यात येणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ या प्रकल्पावर देखरेख करणार आहे. मुंबईतील जेएनपीटी बंदर आणि नागपूर विमानतळ ही महत्त्वाची केंद्रे या रस्त्यामुळे जोडली जाणार आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात या महामार्गामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.