मुरबाड : सातत्याने होणाºया भारनियमनाबाबत तक्रार न करता त्यावर ठोस उपाय शोधण्याचा प्रयत्न मुरबाडमधील तुषार बाळू रोकडे याने केला आहे. सहावीत शिकणा-या तुषारने भंगारातील वस्तूंपासून एक मशीन बनवून या ‘बत्ती गुल’वर आपल्या परीने उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. या चिमुरड्याने बनवलेले हे मशीन पाहण्यासाठी लोकांची रीघ लागली असून ते तुषारवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.मुरबाड शहराजवळील नागाचा खडक येथील तुषार रोकडे हा देवगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिकतो. शाळेत वारंवार वीज जात असल्याने त्याने एक उपाय शोधला आहे. भंगारामध्ये सापडलेल्या वस्तू जमा करून त्यापासून त्याने एक मशीन बनवले. छोटा दिवा लागेल आणि लहान पंखादेखील सुरू राहील,हे मशीन बनवण्यासाठी तुषारने रिमोट कंट्रोल गाडीतील मोटार, छोटा साउंड बॉक्स, छोटा पंखा आणि मोबाइलची जुनी बॅटरी असे जमा करून एक मशीन तयार केले आहे. या मशीनवर चालणारा दिवा किमान पाच तास सलग प्रकाश देऊ शकतो, असे तो सांगतो.यासाठी तुषारने प्रथम जुना साऊंड बॉक्स घेऊन त्यातील लोहचुंबकाला एक बॅटरीचा सेल घेऊन वायर जोडली असता बॅटरीचा बल्ब पेटला. नंतर त्याने काही जुने मोबाइल घेऊन त्यावरही हा प्रयोग करून पाहिला. हा संपूर्ण प्रयोग त्याने स्वयंप्रेरणेने केला आहे.
तुषारने बनवले भंगार वस्तूंपासून मशीन, भारनियमनाने त्रस्त झालेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 6:22 AM