सदानंद नाईक, उल्हासनगर : हजारो नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेले खडी खदान येथील डम्पिंग ग्राऊंड हटविण्यासाठीं काँग्रेस पक्ष महापालिकेकडे पाठपुरावा करीत आहे. त्यासाठी बुधवार पासून उपोषण करण्याचा इशारा काँग्रेस पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी दिला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-५, खडी खदान येथील डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लॉ झाले असून क्षमता केंव्हाची संपली आहे. डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला उन्हाळा व हिवाळ्यात लागणाऱ्या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य असते. तर पावसाळ्यात परिसरात डम्पिंगची दुर्गंधी पसरते. डम्पिंग परिसरातील शेकडो नागरिकांना खाज, त्वचा रोग, दमा, टीबी आदी रोगाची लागण झाल्याची माहिती स्थानिक नागरिक देत असून २४ तास उघडा राहणाऱ्या रुग्णालयाची मागणी स्थानिकांची आहे. तसेच डम्पिंगसाठी शासनाने पर्यायी जागा दिल्याने, त्याजागी डम्पिंग हटविण्याची मागणी स्थानिक नागरिक, नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिकेकडे लावून धरली. त्यासाठी रस्ता रोखो, उपोषण, धरणे आंदोलन स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी केली. आतातर डम्पिंगची काय स्थिती आहे, ते कुठे व केंव्हा हटविणार याबाबत महापालिका प्रशासन काहीएक बोलत नसल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी केला.
हजारो नागरिकांच्या आरोग्यासाठी डम्पिंग हटविण्यासाठीं काँग्रेस पक्षाकडून पाठपुरावा केला जात आहे. मात्र याबाबत काहीएक निर्णय महापालिका घेत नसल्याने, अखेर रोहित साळवे यांनी बुधवारी नेताजी चौकात सहकाऱ्यांसह उपोषणाचा इशारा दिला. डम्पिंग हटविण्याची प्रक्रिया सुरू करणे, ज्याठिकाणी डम्पिंग हटविले जाणार. तेथिल परिस्थिती काय? पावसाळ्यात डम्पिंग मधून प्रचंड दुर्गंधी येते. त्यावर काही उपाययोजना केली का? असा प्रश्न साळवे यांनी केला. तसेच प्रसिद्ध शिवमंदिर, सिंधी समाजाचे चालिया मंदिर डम्पिंग ग्राऊंड पासून अवघे १ की.मी. परिसरात येत असल्याचे साळवे यांचे म्हणणे आहे.