अंबरनाथ : अंबरनाथमधील पाच प्रमुख रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी एमएमआरडीएने निधी दिला आहे. मात्र निधी असतानाही या रस्त्यांचे काम सुरू करण्यात अडचणी येत आहेत. केवळ एकाच रस्त्याचे काम सुरू असून उर्वरित चारही रस्त्यांचे काम अजूनही कागदावरच आहे. रस्त्याच्या आड येणारे अतिक्रमण काढण्यासाठी पालिका प्रशासन पुढाकार घेत नसल्याने एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी पालिकेला चांगलेच धारेवर धरले. ही अतिक्रमणे काढण्यासाठी १५ दिवसांची मुदत पालिकेला दिली आहे.शहरातील पाच मुख्य रस्त्यांच्या कामासाठी एमएमआरडीएने ५५ कोटींचा निधी दिला आहे. त्यातील शिवाजी चौक ते लोकनगरी या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र हा रस्ताही काही ठिकाणी अतिक्रमणांचा मुद्दा आल्याने तसाच रखडलेला आहे. तर उर्वरित चार रस्त्यांचे अजूनही काम सुरू झालेले नाही. त्यातील बेथल चर्च ते फुलेनगर रस्त्याचे काम अतिक्रमणांमुळे थांबले आहे. या रस्त्याचे अतिक्रमण काढण्याकडे पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. तसेच खांबकर वाडी रस्ता, स्वामी समर्थ चौक रस्त्यांचीही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे.शहरातील मुख्य रस्त्यांसाठी निधी आलेला असतानाही या रस्त्याचे काम होत नसल्याने एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी बैठक घेतली. या प्रकरणात पालिकेला रस्त्यांसदर्भात खुलासा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी झालेल्या बैठकीत शहरातील या पाच रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतलेला नाही ही बाब समोर आली.पालिका प्रशासनाची उदासीनता कारणीभूतरस्त्याचे प्रस्ताव मंजूर झाल्यावर पालिकेने अतिक्रमण काढण्याबाबत कार्यवाही करण्याची गरज होती. मात्र ते न केल्याने आज हे अतिक्रमण निघत नाही आणि त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. रस्ता मोकळा न केल्याने कंत्राटदारानेही रस्त्याचे काम पूर्ण केलेले नाही. अखेर या प्रकरणी एमएमआरडीएचे अतिरीक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी पालिका अधिकाºयांना १५ दिवसात अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून देण्याचे आदेश दिले.
अतिक्रमणे १५ दिवसांत काढा; अंबरनाथ पालिकेला आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:19 AM