- सदानंद नाईक उल्हासनगर : शहरातील हिराली फाउंडेशन, जय झुलेलाल समघर्ष सेवा समिति, रेसिडेंस एसोसिएशन आदी सामाजिक संस्थेच्या वतीने शहरातील वालधुनी नदीवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी प्रांत अधिकारी यांच्याकडे केली. सामाजिक संस्थेच्या पदाधिकार्यांनी हातात वालधुनी बचावचे पोस्टर्स घेऊन, याबाबत प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांना निवेदन दिले.
शहराच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदी पूर नियंत्रण रेषेत सर्रासपणे अवैध बांधकाम होत असून महापालिका व प्रांत कार्यालय याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विविध सामाजिक संस्थेने यापूर्वी केला आहे. अखेर बुधवारी दुपारी सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत हातात पोंस्टर्स घेत प्रांत कार्यालयावर धडक दिली. त्यांनी यावेळी वालधुनी नदी किनाऱ्यावरील अवैध बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली. तसे निवेदन प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांना दिले. त्याच बरोबर उल्हासनगर तहसीलदार कार्यालय, उपविभागीय कार्यालय, महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, पर्यावरण संरक्षण विभाग, प्रभाग समिती क्रं-३ चे प्रभाग अधिकारी, मध्यवर्ती पुलिस स्टेशन आदी कार्यलयाना वालधुनी नदी किनाऱ्यावर अतिक्रमण बाबत निवेदन देऊन कारवाईची मागणी केली.
शहरातील विविध सामाजिक संस्थेने एकत्र येत वालधुनी नदी किनाऱ्यावरील अतिक्रमण बाबत आवाज उठवून महापालिका, प्रांत कार्यालय, तहसिलदार यांच्यासह अन्य कार्यलयाना निवेदन दिले. तसेच कारवाई झाली नाहीतर, आमरण उपोषणाचा इशारा संघटनेने दिला आहे.