महेश आहेर यांच्याकडील अतिक्रमण विभाग काढा; काँग्रेस आक्रमक, आयुक्तांना पाठविले पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 07:09 AM2023-03-29T07:09:17+5:302023-03-29T07:10:22+5:30
वाद चिघळण्याची शक्यता
ठाणे : महापालिकेचे सहायक आयुक्त महेश आहेर यांच्याकडील अतिक्रमण विरोधी विभागाच्या कारभारावरून वाद झाल्याने विधिमंडळात मुद्दा गाजल्यानंतरही आहेर यांच्याकडील अतिक्रमण विरोधी विभागाचा कार्यभार काढण्यात न आल्याने वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. आहेर यांना उच्चपदस्थांचा आशीर्वाद असल्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांना यामुळे पुष्टी मिळत असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांमध्ये बोलले जात आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पत्र लिहून आहेर यांच्याकडील अतिक्रमण विभागाचा कार्यभार काढण्याची मागणी केली.
आहेर यांच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सातत्याने आवाज उठविला होता. यासंदर्भात अधिवेशनात चर्चा झाली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत केली जाईल, असे आश्वासन दिले होते. चौकशी होईपर्यंत त्यांचा पदभार काढण्याचे आश्वासनही अधिवेशनात दिले होते. ठाणे महापालिकेने त्यांच्याकडील कार्यालयीन उपाधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेतला; परंतु त्यांच्याकडील अतिक्रमण विभागाच्या सहायक आयुक्त पदाचा कार्यभार तसाच ठेवला आहे. त्यावरून आता काँग्रेस आक्रमक झाली आहे.
ज्या मुद्यावरून मागील काही महिने आवाज उठविण्यात आला होता. त्यावरून कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, आहेर यांना पाठीशी घालण्याचे काम केले जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला. आहेर हे सध्या उपखातेप्रमुख पदावर कार्यरत असून त्यांच्याकडे २२/०७/२०२१ रोजी सहायक आयुक्त उथळसर प्रभाग समिती व १/४/२०२२ रोजी सहायक आयुक्त (अतिक्रमण) या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला.
उपखातेप्रमुख पदावर नेमणूक करावी
एमसीएसआरमधील तरतुदी व शासन निर्णय ५/९/२०१८ मधील मार्गदर्शक तत्त्वानुसार दोन वर्षांपेक्षा अधिक काळ तसेच एकापेक्षा अधिक समकक्षकालीन पदांचा कार्यभार व कनिष्ठ पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या पदापेक्षा दोन पद वरच्या पदाचा कार्यभार देता येत नाही अशी तरतूद आहे. आहेर यांना दिलेल्या सहायक आयुक्त पदाचा कार्यभार त्वरित काढावा व त्याची नेमणूक पुन्हा उपखातेप्रमुख पदावर करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.