ठाणे - दिवंगत नामदार मधू दंडवते यांच्या पाठपुराव्याने सुरू झालेल्या कोकण रेल्वेचा लाभ कोकणवासीयांपेक्षा परराज्यांतील नागरिक अधिक प्रमाणात घेत आहेत. त्यात आता रूपडे बदललेल्या कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसच्या बोगीव्यवस्थेत केलेल्या बदलामुळे अनारक्षित प्रवाशांची गैरसोय होत आहे. तेव्हा रद्द केलेल्या जनरल बोग्या पुन्हा जोडण्यात येऊन कोकणवासीयांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी सोमवारी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली. या मागणीसह विविध मागण्या संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे केल्या आहेत.कोकण रेल्वेसाठी कोकणवासीयांच्याच बहुतांश जमिनी उपयोगात आणल्या गेल्या आहेत. असे असले तरी अद्याप या भूमिपुत्रांना न्याय मिळालेला नाही. कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची सर्वाधिक संख्या दादर व ठाणे स्थानकातून आहे. यासाठी गाडी क्र . (१०१११/१०११२) कोकणकन्या एक्स्प्रेस आणि गाडी क्र . (१०१०३/१०१०४) मांडवी एक्स्प्रेस या दोन एक्स्प्रेस गाड्या आहेत. त्यांना सुधारित बोग्यांसहित नवीन आसनव्यवस्थेच्या बोगी उपलब्ध केल्याने चाकरमान्यांची गैरसोय होत आहे. कारण, जुन्या दोन्ही गाड्यांना सर्वसामान्य प्रवाशांसाठी असलेल्या छ.शि.म. टर्मिनस आणि दादर टर्मिनस येथील अनारक्षित बोगी, महिलांसाठी असलेली राखीव बोगी तसेच अपंग बोगी रद्द झाल्याचा फटका बसत आहे. तेव्हा या बोग्या पुन्हा जोडण्यात येऊन कोकणवासीयांवरील अन्याय दूर करण्यात यावा. यासह कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्थानकावरील आरक्षित तिकिटांचा कोटा किती व कोणत्या प्रकारचा आहे, याचबरोबर उशिराने धावणा-या गाड्यांचे वेळापत्रक अथवा संदेशाद्वारे कळवण्याची मागणीही करण्यात आली आहे.मुंबई-मेंगलोर एक्स्प्रेस या गाडीला करमाळीऐवजी थिवीम स्थानकात थांबा द्यावा. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते रत्नागिरी अशी एक नवीन इंटरसिटी एक्स्प्रेस चालू करून रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही वेळेअभावी अनेकदा दिवा स्थानकावरून परतीचा प्रवास करते, त्यामुळे ही गाडी दिवा-रत्नागिरी-दिवा अशीच चालवावी. दिवा स्थानकातून सुटणारी गाडी क्र . (६१०१३) दिवा-रोहा डेमू गाडीप्रमाणे रोहा-चिपळूण अशी डेमू गाडी चालू करावी. परतीच्या प्रवासात कोकणातील महत्त्वाच्या गाड्यांना कणकवली स्थानकात एक अनारक्षित बोगी राखीव ठेवावी, अशा विविध मागण्या केल्या.
‘कोकण रेल्वे प्रवाशांच्या गैरसोयी दूर करा’; प्रवासी संघाचा एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 1:09 AM