अंबरनाथ : येथील अपूर्णावस्थेत असलेला स्कायवॉक महात्मा गांधी शाळेपर्यंत बांधण्यास एमएमआरडीचे आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी परवानगी दिली आहे. भाजपाचे ठाणे, पालघर विभागीय उपाध्यक्ष किसन तारमळे यांनी मदान यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.पश्चिमेला २०१२ च्या सुमारास बांधण्यात आलेला स्कायवॉक महात्मा गांधी शाळेपर्यंत बांधायचे ठरले होते. मात्र, स्कायवॉकचे काम नगरपालिका कार्यालयापर्यंतच करण्यात आले. तसेच संबंधित पूल रेल्वे पुलाला समांतर बांधला नसल्याने रेल्वे पुलावरून काही पायऱ्या उतरून नंतर पुन्हा स्कायवॉकच्या पायऱ्या चढून जावे लागते. नगरपालिका कार्यालयापासून काही अंतरावर कल्याण-बदलापूर हा महामार्ग असल्याने विद्यार्थी तसेच नागरिकांना रस्ता ओलांडणे धोक्याचे झाले आहे. या रस्त्यावर मागील काही दिवसांपासून अपघात झाले आहेत. त्यामुळे एमएमआरडीएने अर्धवट बांधलेल्या स्कायवॉकचे काम शाळेपर्यंत पूर्ण करण्याची मागणी तारमळे यांनी एमएमआरडीएचे आयुक्त मदान यांच्याकडे केली होती. महात्मा गांधी शाळेचा नाहरकत दाखला आणि निवेदन तारमळे यांनी दिले. शहर सचिव संदीप विशे आणि भगवान सासे उपस्थित होते. महात्मा गांधी शाळा व्यवस्थापनानेही बांधकामास हरकत नसल्याचे कळवले आहे. मदान यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी स्कायवॉकचे वाढीव बांधकाम सुरू केले जाईल, अशी ग्वाही दिल्याचे तारमळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
गांधी शाळेजवळ स्कायवॉक उतरवणार
By admin | Published: January 28, 2017 2:40 AM